अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-गेल्या तीन महिन्यांपासून तेजीत असणारा कांदा आता हळूहळू कमी होत असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात लाल कांद्याला तीन हजार तर गावरान कांद्याला दोन हजार प्रती क्विंटल भाव निघाला.
यामुळे हजारो रुपये खर्च करून पिकविलेल्या कांद्याला भाव नसल्याने शेतकर्यांची पुन्हा आर्थिक कोंडी होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तेजीत असणारा कांदा आता पुन्हा घसरण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी (दि.5) नगर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये भावात घसरण झाली.
भाव गडगडल्यानेे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. यंदा उन्हाळी कांदा शेतकर्यांकडे मोठ्या प्रमाणात होता. केवळ घरगुती वापरासाठी कांदा विक्री झाल्याने उन्हाळी गावरान कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. गत पंधरा दिवसांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक होत असल्याने गावरान कांद्यालाही कमी भाव मिळू लागला.
यात लाल कांदा बाजी मारतांना दिसत आहे. नगर बाजार समितीत शनिवारी झालेल्या लिलावात 12 हजार 797 क्विंटल गावरान कांद्याची आवक होऊन प्रथम प्रतवारी च्या कांद्याला 2 हजार ते 2 हजार 400 रुपयांचा भाव मिळाला. याशिवाय 9 हजार 632 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्याला 2 हजार 500 ते 3 हजार रुपयांचा भाव मिळाला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved