अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे.
मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. आता या पार्श्वभूमीवर मंदिर उघडण्याच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजनांकरिता तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी व कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सिंघल यांच्यासमवेत दिनांक 6 सप्टेंबर 2020 रोजी बैठक पार पडली.
श्रीसाईबाबांचे मंदिर दर्शनाकरिता खुले करण्यासाठी अनेक भक्तांचे, शहरातील नागरिकांचे तसेच काही राजकीय पक्षांची निवेदने संस्थानला प्राप्त झालेली आहेत. शासनाने याबाबत मंदिर खुले करण्यास परवानगी दिल्यास प्रशासनाची तत्परता असावी म्हणून नियोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
श्रीसाईबाबा संस्थानच्या सभागृहात हे बैठक झाली. या बैठकीस तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी, कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सिंघल, उपकार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे,
प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले व बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाय-योजनांबाबत चर्चा करून काही सूचनाही त्यांनी केल्या. याबरोबरच आवश्यकता असल्यास श्रीसाईबाबा संस्थानच्या अधिकार्यांचे पथक तिरुपती
येथे पाठवल्यास त्यांना तिरुपती देवस्थानने करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना प्रत्यक्ष दाखविता येतील, असे तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सिंघल यांनी या बैठकीत सांगितले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved