अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणे या नामांकित संस्थेद्वारे दिला जाणारा गौरव पुरस्कार या वर्षी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांना जाहीर झाला आहे.
प्रतिवर्षी स्व. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा हा पुरस्कार प्रशांत गडाख यांच्या ‘गाव तिथे वाचनालय’ या अभियानासाठी त्यांना घोषित करण्यात आला आहे. प्रसारिणी सभेचे अध्यक्ष उध्दव कानडे व कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी पुणे येथे या पुरस्काराची घोषणा केली.
महाराष्ट्रातील सामाजिक, शिक्षण, विज्ञान व साहित्य क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवारी (२४ जानेवारी) सायंकाळी ५.४५ वाजता पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात होणार आहे.
गडाख यांच्या समवेत वैज्ञानिक डाॅ. रघुनाथ माशेलकर व सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व प्रदान केला जाणार आहे.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवशी एक नवा सामाजिक उपक्रम हाती घेतला जातो. १२ मे २०१६ या दिवशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गडाख यांनी ‘गाव तिथे वाचनालय’ या अभियानाची घोषणा केली होती.
त्या अंतर्गत नेवासे तालुक्यातील प्रत्येक गावात सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला. विशेषतः तरुण व महिलांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी हा प्रतिष्ठानचा हेतू होता. या वाचनालयांना प्रतिष्ठानतर्फे नियमित पुस्तके वितरीत केली जातात.
या चळवळीची व्याप्ती वाढवण्यासाठी नेवासे तालुक्यातील सर्व सत्कार, समारंभ, वाढदिवस अशा सार्वजनिक व कौटुंबिक सोहळ्यांमध्ये पुस्तके भेट दिली जावीत, असे आवाहन गडाख यांनी केले होते. त्याला आता तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
२७ डिसेंबर या आपल्या वाढदिवशी शुभेच्छा देणाऱ्यांनी आपल्याला पुस्तके भेट द्यावी, असे आवाहन गडाख यांनी केले होते. नेवासे तालुक्यातील सर्वसामान्यांनी या आवाहनाला दिलेल्या प्रचंड प्रतिसादातून त्या दिवशी १६ लाखांची पुस्तके भेट देण्यात आली. लवकरच ही सर्व पुस्तके तालुक्यातील वाचनालयांना वितरित केली जाणार आहेत.
अहमदनगरमध्ये भरवलेल्या ७० व्या मराठी साहित्य संमेलनामुळे वाचन, साहित्य आणि पुस्तके हे जिल्ह्याला यशवंतराव गडाख साहेबांनी दिलेले वरदान आहे. आपण केवळ हे काम सर्वांच्या सहकार्याने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.
खेडोपाडी तरुणांच्या आणि महिलांच्या हाती पुस्तके दिसत आहेत, याचा आनंद वाटतो. डाॅ. माशेलकर व श्रीनिवास पाटील या व्यक्तींबरोबर व थोरात साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळतो आहे हे माझ्यासाठी प्रेरणादायी असेल, अशी प्रतिक्रिया गडाख यांनी दिली.
Web Title – Prashant Gadakh announces glory