Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट श्रीरामपूर मतदारसंघ

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूरची निवडणूक रंगतदार वळणावर

एकेकाळी देशातील साखरेची बाजारपेठ अशी ओळख असलेलं श्रीरामपूर सध्या बकाल झालं आहे. उत्तर नगर जिल्ह्याचं मुख्यालय म्हणून या शहराकडं पाहिलं जात होतं; परंतु आता शहराचं वैभव लयाला गेलं आहे. सहकारी साखर कारखानदारी आणि सहकारी संस्था लयाला गेल्यानं ही अवस्था झाली आहे. ज्येष्ठांच्या निवासाचं शहर म्हणून आता त्याची ओळख व्हायला लागली आहे.

श्रीरामपूरला एमआयडीसी आहे; परंतु तिच्यातील उद्योग स्थानिक आहेत. त्यांच्या रोजगार क्षमतेला मर्यादा आहेत. एकही मदर इंडस्ट्री नसल्यानं पूरक उद्योग वाढत नाहीत. श्रीरामपूरचा तरुण रोजगारानिमित्त अन्य शहरांत गेला आहे.

श्रीरामपूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे दोनदा निवडून गेले. त्यांना माजी आमदार जयंत ससाणे यांचा वरदहस्त होता. जयंतरावांचा श्रीरामपूर शहरावर पगडा होता. त्यांचं संघटन होतं.

राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचं सख्य होतं. दोघांना राम-लक्ष्मणाची जोडी म्हटलं जायचं. बाळासाहेब विखे आणि जयंतरावांत दुरावा झाला, तरी राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्यांशी चांगले संबंध कायम ठेवले. जयंतरावांचं निधन झालं.

त्या अगोदरच कांबळे यांनी जयंतरावांचा विश्वासघात केला, असा जयंतरावांच्या समर्थकांचा आरोप आहे. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांचा तर त्यांच्यावर खूप राग आहे. त्यामुळं तर कांबळे लोकसभेला उभे राहिले, तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली.

अगोदर विखे यांच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद स्वीकारलं आणि नंतर विखे यांच्या सांगण्यानुसारच नाकारलंही. कांबळे यांची अडचण अशी आहे, की त्यांचं स्वतःचं काहीच संघटन नाही. ते पूर्णतः विखे यांच्यावर अवलंबून आहेत.

विखे यांनी त्यांना निवडून आणण्याची भूमिका घेतली असली, तरी लोकसभेच्या वेळी कांबळे यांनी आपलं ऐकलं नाही, हा त्यांचा राग कायम आहे. खासदार डाॅ.सुजय विखे यांनी राहुरीच्या सभेत तो बोलूनही दाखविला आहे. श्रीरामपुरात तीनच गट प्रमुख आहे.

त्यांच्यामागं पक्ष धावतात. कोणत्याही पक्षाचं स्वतःच म्हणून काहीच नेटवर्क नाही. भानुदास मुरकुटे, जयंत ससाणे, गोविंदराव आदिक यांचे हे तीन गट. विखे यांचा गटही असला, तरी तो ससाणे यांच्याशी जुळवून घेणारा आहे. गोविंदराव यांच्या निधनानंतर त्यांचा गट कमकुवत झाला असला, तरी पालिकेत त्यांच्या कन्या नगराध्यक्ष आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर काँग्रेसच्या असलेल्या कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर शिवसेनेतून गेल्या वेळी निवडणूक लढविलेल्या आणि आताही उमेदवारीची प्रतीक्षा करीत असलेल्या साहित्यिक आणि माजी प्रशासकीय अधिकारी लहू कानडे यांनी त्यामुळं शिवसेनेला जय महाराष्ट्र करून हाती पंजा धरला.

कानडे मूळचे नेवासे तालुक्यातील असले आणि नगरमध्ये ते स्थायिक झाले, तरी गेल्या पाच वर्षांपासून ते श्रीरामपूरमध्ये राहतात. तेथील संपर्क त्यांनी वाढविला आहे. कांबळे यांनी फसविल्याचा अनुभव थोरात आणि विखे या दोघांनाही आला आहे. लोकसभेसाठी थोरात यांनी कांबळे यांचा प्रचार केला, आता त्यांना कांबळे यांच्याविरोधात प्रचार करण्याची वेळ आली आहे.

कानडे जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असताना शालिनी विखे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळं विखे यांची भूमिका त्यांच्याबाबत फार टोकाची असणार नाही. मुरकुटे गटाची शहरात फार ताकद नसली, तरी ग्रामीण भागात त्यांचा गट प्रबळ आहे. त्यांची ताकद आता कांबळे यांच्या बाजूनं आहे. मुरकुटे पूर्वी  शिवसेनेचे उमेदवार होते.

त्या वेळी त्यांनी बाळासाहेब विखे यांच्याविरोधात भूमिका  घेतली होती. आता ससाणे गटानं काँग्रेसच्या बाजूनं जाण्याचा निर्णय घेतल्यानं मुरकुटे गटानं आ. कांबळे यांची साथ करायचा निर्णय घेतला आहे.

विखे यांची मदत घेऊन आमदार झालेल्या मुरकुटे यांना पुन्हा एकदा विखे यांच्यांसोबत जावं लागलं आहे. विखेही कधी मुरकुटे यांना विरोध करतात, तर कधी त्यांना जवळ करतात. आता कांबळे यांच्या बाजूनं ते उतरल्यानं कांबळे-कानडे लढतीत रंग भरला आहे. किंगपेक्षा किंगमेकरमधील लढाई इथं महत्त्वाची आहे. किंग हा नामधारीच राहणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment