अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे.
अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.

वयाची पन्नाशी गाठलेल्या आजच्या पिढीने कधीच पाहिला नाही असा पाऊस यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून होतोय. सुरुवातीला तो चांगला वाटला. खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या. कुणालाच वाटलं नाही आज चांगला वाटणारा पाऊस पुढे नकोसा होईल. पावसाळा सुरू होऊन शंभर दिवस झालेत.
यावर्षी काही ठिकाणी साठ दिवस पाऊस झाला आहे. तोही अनेकदा ढगफुटीसारखा.ओढे नालेही वाहून वाहून थकून गेले आहेत.सगळी धरणं भरली.नद्यांना भरपूर पाणी वाहिले.जिरायत भागात गेल्या तीस चाळीस वर्षांत कधीच भरली नव्हती असे बंधारे आणि तलाव दोन-तीन वेळा भरून त्यांच्या भिंतीवरून पाणी वाहत आहे.
जिरायती भागातील विहिरींचे पाणी जमिनीच्या पातळीपर्यंत आले आहे.विंधन विहिरीतून आपोआप पाणी बाहेर पडत आहे.यावर्षीच्या अधिकच्या पावसाने अनेक शेतकर्यांना दुबार पेरणी करण्यास भाग पाडले. यावर्षी पावसाने सरासरी केव्हाच ओलांडली.
सर्वच नक्षत्र मनशोक्त बरसली आजही सप्टेंबर महिना संपत आला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेईना. महाराष्ट्रात सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये मान्सून परतीच्या प्रवासावर असतो; परंतु चालू वर्षी अजूनही धो-धो कोसळत आहे. त्यामुळे ज्वारी पिकाच्या पेरण्या चांगल्याच पुढे लांबत चालल्या आहेत. साधारणपणे गोकुळ अष्टमीनंतर ज्वारी पेरणीला सुरुवात होते;
परंतु सततच्या पावसाने बाळीराजाचे वेळापत्रक बिघडले आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ज्वारी पिकाची कोळपणी, खुरपणी चालू असते परंतु आज घडीला अजून पेरण्याच नाहीत व अजूनही लवकर होण्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.
जिल्हाभरात पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे व विहिरीचे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved