पाथर्डी तील आल्हणवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज आश्रम शाळेतील इयत्ता तिसरीतील पायल संदीप पांढरे (वय ९ ) व इयत्ता दुसरीतील सुरज संदीप पांढरे (वय ८)या निवासी शाळेतील मुलांचा शाळेच्या पाठीमागील बाजुला असलेल्या शेततळ्यात बुडुन शुक्रवारी (दि.२७) दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
दरम्यान, आश्रमशाळेचे संस्थाचालक घटनास्थळी आले नाहीत, त्यामुळे मुलांच्या मृत्युस कोण जबाबदार हे निश्चीत करा, तोपर्यंत मुलांचे मृतदेह उचलू देणार नाहीत अशी भुमिका संतप्त झालेल्या आल्हणवाडीच्या ग्रामस्थांनी घेतली.
पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोना सुहास गायकवाड ‘व सहकारी घटनास्थळी गेले. मुलांचे नातेवाईक बाहेरगावी असल्याने त्यांना घटनास्थळी यायला उशीर झाला. दरम्यान, पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.
मात्र रात्री उशीरापर्यंत पंचनामा करा व मृत्युला नेमके कोण जबाबदार हे निश्चीत करा आणि मगच मृतदेह उचला अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आश्रमशाळेत असणारी मुले मधल्या सुट्टीत शेजारच्या शेततळ्यात पोहायला गेले होते. त्यांनी कपडे शेततळ्याच्या भिंतीवर काढुन ठेवले होते.
पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर मुलांना वरती येता आले नाही. पाण्यात बुडुन मुलांचा मृत्यु झाला. दोघेजण शाळेतून बाहेर गेले, मग अधिक्षक कुठेहोते, असा सवाल उपस्थित करत त्यांची चौकशी करा.
एवढी गंभीर घटना घडली तरी संस्थाचालक घटनास्थळी न आल्यामुळे ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले होते. गरीब कुटुंबातील मुलांचा मृत्यु झाल्याने ग्रामस्थांचा राग वाढतच गेला.
याला जबाबदार नेमके कोण? हे ठरवा असा आग्रह धरीत ग्रामस्थांनी सुमारे साडेचार तास मृतदेह उचलण्यास विरोध केला. रात्री उशीरापर्यंत पोलिस अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात चर्चा सुरु होती.
आल्हनवाडी येथील घटनेची माहितीमिळाली असून मी शनिवारी (दि.२८) आल्हनवाडी येथील आश्रमशाळेला भेट देणार आहे. घटनेची चौकशी करु. ज्यांनी दिरंगाई दुर्लक्ष केले असेल, जेचौकशीत निष्यन्न होईल, त्या दोषीवर कडक कारवाई केली जाईल. – राधाकिसन देवढे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, अहमदनगर