धक्कादायक ! सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात सावकारांचा फास गोरगरिबांच्या गळ्याचा घोट घेऊ लागला आहे. कर्जत- जामखेड तालुक्यात सावकारकीच्या अनेक घटना घडलेल्या असताना जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून अधिक एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरातील गणपतवाडी भागातील एका शेतकऱ्याने खाजगी सावकाराचा सततचा तगादा आणि मानसिक जाच या त्रासामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानदेव विठ्ठल शेळके असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, शेळके यांना तातडीने नगर येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

नेमका काय लिहिले आहे त्या चिठ्ठीत? जाणून घ्या मजकूर… ‘मा.पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन राहुरी जि.अहमदनगर यांच्या कडेस मी स्वतः श्री.ज्ञानदेव विठ्ठल शेळके राहणार मानोरी ता.राहुरी जबाब लिहुन देतो की, मी तीन वर्षांपूर्वी मानोरी गावातील चार लोकांकडून व्याजाने पैसे घेतले आहे.

त्याचे आजपर्यंत व्याज दिले आहे. त्या लोकांना मी स्टेट बँकेचे चेक दिलेले आहे. सदर लोकांनी मला वारंवार पैक्षाची मागणी करूण मानसिक ञास दिला. त्या ञासाला कंटाळून मी आज रोजी आत्महत्या करीत आहे.

याबाबत माझ्या कुटूंबियाची यात कोणताही प्रकारची चुक नाही त्यांना कुणीही ञास देऊ नये हि विनंती तसेच साहेब मी मेल्यानंतर माझ्या कुटूंबियांना ञास देऊन पैक्षाची मागणी करूण ञास देतील तरी त्यांच्या पासून माझ्या कुटूंबियांचे संरक्षण करावे.

या लोकांना मी मुद्दल रक्कम पैक्षा जास्त व्याज दिले आहे. तसेच माझे बंधू सोपान व रामदास यांना विनंती आहे की, आपल्या आईचा (बाई) सांभाळ करावा व तीचा शेवट गोड करावा हीच माझी शेवटची इच्छा हि विनंती. माझ्या आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरू नये विनंती.’

अशा आशायची चिठ्ठी लिहुन या शेतक-याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान शेतकऱ्याने लिहिलेल्या या चिठ्ठीत संबंधित सावकारांचे नावे नसून त्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe