Loksabha Election : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या चर्चेत आहे. सरकारने कुणबी वगळता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचे विधेयक विधिमंडळात बहुमताने पारित देखील झाले आहे.
मात्र मराठा आंदोलनाचे शिल्पकार मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. जरांगे पाटील यांना दहा टक्के आरक्षण मान्य नाही. त्यांनी कुणबी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीच्या सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र बहाल केले गेले पाहिजे ? अशी मागणी केली असून याबाबतचा कायदा सरकारने करावा असे म्हटले आहे.
तसेच जोपर्यंत सगेसोयऱ्यांची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार असे म्हटले आहे. दरम्यान याच आंदोलनाचा एक भाग म्हणून मराठा समाजाने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातील दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
उमेदवारीवरून बीड, नांदेड येथे मराठा समाजाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली होती. दरम्यान, आता परभणीतही याच मुद्द्यावर मराठा समाजाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. यामध्ये मराठा समाज बांधवांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या महत्त्वाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मराठा समाजाचे एक हजार उमेदवार उभे करायचे असे ठरले आहे. एकंदरीत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात मराठा समाजाने शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
मोदी यांच्या विरोधात मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. याबाबत मराठा समाजाकडून ठराव सुद्धा मंजूर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. वाराणसी पाठोपाठ राहुल गांधी यांच्या मतदारसंघात देखील हजारो उमेदवार अर्ज भरणार आहेत.
तसेच बारामती आणि ठाणे या मतदार संघात सुद्धा मराठा समाज बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच येणाऱ्या दिवसात राजकीय नेत्यांसाठी गाव बंदी पाठोपाठ घर बंदी करण्याचा ठराव देखील आजच्या या महत्त्वाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
जर सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात दोन हजार उमेदवार उभे करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. पीएम मोदी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांसारख्या नेत्यांच्या विरोधात मराठा समाजातील उमेदवार उभे केले जाणार आहेत.
आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक गावातून दोन उमेदवारी अर्ज सादर केले जातील. तसेच कोणत्याही नेत्याच्या कार्यक्रमाला मराठा समाज हजेरी लावणार नाही असे देखील या बैठकीत ठरले आहे. एकंदरीत, जर मराठा समाजाने खरंच प्रत्येक मतदारसंघात हजारो उमेदवार उभे केले तर निवडणूक आयोगाची देखील पंचायत होण्याची शक्यता आहे.
निवडणुक आयोगाला जर एका जागेसाठी हजारो उमेदवार उभे राहिलेत तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. यामुळे, सरकार मराठा समाजाच्या या भूमिके नंतर काय निर्णय घेणारे हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.