पदवीधर आणि शिक्षक मतदानासाठी मतदार नोंदणी कशी करतात? काय असते त्यासाठीची पात्रता? वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
voter registration

देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे व आतापर्यंत या निवडणुकीचे चार टप्पे पार पडले असून देशात एकूण सात आणि राज्यात पाच टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल चार जून 2024 रोजी जाहीर केला जाणार आहे व या  लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या ज्या काही चार जागा आहेत याकरिता इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.

या चार जागांकरिता मुंबई आणि कोकण विभागात पदवीधर व मुंबई शिक्षक आणि नासिक शिक्षक मतदार संघासाठी ही विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत बघितले तर ही संपूर्ण प्रक्रिया विधानसभा निवडणुकीपेक्षा संपूर्ण वेगळी असते

व या निवडणुकीचे मतदान करणारे मतदार देखील वेगळे असतात. कारण काही विशिष्ट पात्रता धारण करणारे मतदारांनाच या करिता मतदार म्हणून नाव नोंदणी करता येते व यासाठी काही पात्रतेच्या अटी असतात. यासंबंधीची माहिती आपण या लेखात घेऊ.

 शिक्षक मतदार नोंदणीकरिता आवश्यक असलेली पात्रता

1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे मतदार करणारा कुठलाही मतदार हा भारताचा नागरिक असावा.

2- त्याने मतदार नोंदणी करिता असलेल्या अहर्ता दिनांकाच्या लगतच्या सहा वर्षात कमीत कमी तीन वर्षे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून पूर्ण वेळ काम केलेले असणे गरजेचे आहे.

3- संबंधित मतदाराने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्रमांक 19 भरणे गरजेचे असते.

 पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्यक असलेली पात्रता

1- पदवीधर मतदार नोंदणी करणारा मतदार हा भारताचा नागरिक असावा.

2- तसेच मतदार नोंदणी करिता अहर्ता दिनांकाच्या किमान तीन वर्षांपूर्वी मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा तत्सम विद्यापीठाचा पदवीधर असावा.

3- मतदार हा सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असणे गरजेचे आहे.

4- तसेच त्याने विहित कागदपत्रांचा फॉर्म क्रमांक 18 भरलेला असावा.

5- समजा मतदाराने डिप्लोमा म्हणजेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल व तो अभ्यासक्रम पदवीतुल्य असेल तरच पदवीधर पात्रता गृहीत धरण्यात येते.

 पदवीधर शिक्षक मतदार नोंदणी करिता आवश्यक असणारी कागदपत्रे

1- रहिवासी पुरावा म्हणून( पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल, लाईट बिल व याशिवाय मान्यताप्राप्त कागदपत्रांची छायांकित प्रत)

2- मार्कशीटची साक्षांकित प्रत, पदवी/ पदविकेचे साक्षांकित प्रत, ओळखपत्र

3- शिक्षक असल्यास नोकरी करीत असल्याबाबत( आजी किंवा माजी) प्राचार्यांचे पत्र, विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदललेले असल्यास त्याबाबतचे गॅझेट म्हणजेच राजपत्र, पॅन कार्ड, गॅझेट नसेल तर प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रे लागतात.

 महत्वाचे

यामध्ये ज्या प्रमाणपत्रांचे तुम्हाला साक्षांकन करायचे आहेत त्यांच्या साक्षांकन प्रती संबंधित जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्य राजपत्रित अधिकाऱ्यांकडूनच करून घेणे गरजेचे आहे.

एवढेच नाही तर मतदार नोंदणी अर्ज आणि कागदपत्राच्या साक्षांकित प्रती  इत्यादी तुम्ही आपल्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा अन्य नामनिर्देशित अधिकारी यांना समक्ष जाऊन सादर करू शकतात किंवा पोस्टाने देखील सादर करू शकतात. परंतु या अधिकाऱ्यांच्या समक्ष कागदपत्रे सादर करून जर पोहोच घेतली तर फायदा होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe