Voter List:- संपूर्ण देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांचे जोरदार वातावरण तयार झाले असून कालच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या व त्यानुसार संपूर्ण देशांमध्ये सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत.
साहजिकच या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे नियम देखील घालून देण्यात आलेले असून नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे. साधारणपणे या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील 97 कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाचा हक्क पार पाडण्यासाठी मतदारांकडे ओळखपत्र असणे गरजेचे असते.
परंतु जर ओळखपत्र नसेल तर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या अकरा कागदपत्रांपैकी एक कागदपत्र असणे गरजेचे आहे. परंतु याशिवाय सगळ्यात महत्त्वाचे आहे ते म्हणजे तुमचे मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही.
जर तुमचे मतदार यादीत नाव नसेल तर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असेल तरीदेखील तुम्हाला मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्याकरिता तुमचे नाव मतदार यादीत असणे खूप गरजेचे आहे.
त्यामुळे ऐन वेळेला धावाधाव करण्यापेक्षा तुम्ही आत्ताच अगदी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटांमध्ये तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे सहजपणे तपासू शकतात. याकरिता तुमच्याकडे तुमचा जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघासह इपीआयसी क्रमांक, नाव तसेच वय व जन्मतारीख त्यांचा तपशील असणे गरजेचे आहे.
अशा पद्धतीने तपासा मतदार यादीतील तुमचे नाव
1- याकरिता तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटर, नाहीतर तुमच्या हातातील मोबाईलचा वापर करू शकता व गुगल वर जाऊन त्या ठिकाणी https://electoralsearch.eci.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल.
2- या ठिकाणी तुम्हाला तीन पर्यायांचा वापर करून तुमचे नाव शोधता येईल त्यापैकी तुम्हाला फक्त एका पर्यायाची निवड करायची आहे.
अ)- तपशिलानुसार शोधणे– या पर्यायानुसार तुम्हाला तुमचे नाव आणि जन्मतारीख सह काही माहिती द्यावी लागणार आहे व त्यानंतर आलेला कॅपचा कोड नमूद करावा आणि सर्च म्हणजेच शोध या बटणावर टॅप करा.
आ)- ईपीआयसीद्वारे शोधणे– या पर्यायांमध्ये तुम्हाला भाषा निवडावी लागेल व भाषा निवडल्यानंतर तुमच्या मतदार कार्डवर म्हणजेच मतदार आयडीवर जो काही ईपीआयसी क्रमांक दिलेला असतो तो क्रमांक व त्यासोबत राज्य आणि कॅपच्या कोड नमूद करावा लागेल. हा कोड नमूद केल्यानंतर सर्च म्हणजेच शोध या बटणावर टॅप करावे लागेल.
इ)- मोबाईलच्या माध्यमातून शोधणे– या पर्यायांमध्ये तुम्हाला राज्य आणि भाषेची निवड करावी लागेल. त्यानंतर मतदार ओळखपत्रासह रजिस्टर मोबाईल क्रमांक आणि कॅपच्या कोड नमूद करावा लागेल व सर्च म्हणजेच शोध या बटनावर टॅप करावे लागेल.
वर दिलेल्या तीनही पर्यायामधून तुम्ही कोणताही एक पर्याय वापरून मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासू शकतात व वेळेला होणाऱ्या अडचणी पासून स्वतःला वाचवू शकता. त्यामुळे ही पद्धत वापरून तुमचे नाव तपासा व तुमचा मतदानाचा हक्क पार पाडा.