Farmer Success Story: शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला आहे. पशुपालनाच्या माध्यमातून भारतात शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे. पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. हा व्यवसाय आता खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारला असून पशुपालन व्यवसायातून नुसते दूध उत्पादनच नाही तर दुग्धप्रक्रिया उद्योग देखील बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. पशुपालन व्यवसायाचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होत असतो.
एक म्हणजे दूध उत्पादनातून मिळणारा पैसा आणि दुसरे म्हणजे जनावरांपासून मिळणारे शेणाचा वापर हा स्वतःच्या शेतासाठी आणि इतर शेतकऱ्यांना विक्री करून देखील शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळतो. याच शेण विक्रीतून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात असलेल्या इमदेवाडी या गावच्या शेतकऱ्याने चक्क गावांमध्ये एक कोटीचा बंगला बांधला आहे. नेमकी ही किमया त्यांनी कशी साधली? याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेणार आहोत.
शेतकऱ्यानी शेण विक्रीतून बांधला एक कोटीचा बंगला
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात असलेल्या इमदेवाडी या गावचे रहिवासी असलेले प्रकाश नेमाडे यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर जमीन आहे. परंतु कायमच बऱ्यापैकी पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या या परिसरामध्ये शेती त्यांना परवडत नव्हती. या माध्यमातून त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे देखील कठीण होते. म्हणून त्यांनी सुरुवातीला गाय पालन सुरू केले व त्या माध्यमातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सोय केली.
गाय पालनातून मिळणाऱ्या दुधाची त्यांनी विक्री केली आहे व त्यांना चांगला पैसा मिळू लागला. सुरुवात त्यांनी फक्त एक गायीपासून केली. अगोदर घरोघरी जाऊन ते दूध विक्री करायचे. परंतु सध्या कष्टाच्या जोरावर त्यांनी या व्यवसायाचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर केला असून त्यांच्याकडे आता 150 गाई आहेत. या माध्यमातून ते दुधाचा व्यवसाय तर करतातच परंतु शेणविक्रीचा व्यवसाय देखील त्यांचा विस्तारला आहे.
दूध विक्रीतून मिळणारे उत्पादन सोडून प्रकाश नेमाडे यांनी शेणाची विक्री करून खूप मोठा उद्योग उभारला आहे. परिसरातील सेंद्रिय शेती करणारे आणि इतर शेतकरी त्यांच्याकडून शेणाची खरेदी मोठ्या प्रमाणावर करतात. या शेण विक्रीतून त्यांना खूप मोठा पैसा मिळत असून यासोबतच त्यांनी गोबर गॅस प्लांट देखील उभारला आहे.
त्यामुळे शेणाच्या माध्यमातून त्यांना पैसा मिळतोच परंतु शेणासोबत गॅस विक्री करून देखील ते चांगला पैसा मिळतात. त्यांच्या गोठ्यामध्ये गाय वयस्कर होईपर्यंत गाईची व्यवस्थित सेवा करतात. या माध्यमातून त्यांनी गावात एक कोटीचा बंगला बांधला असून या बंगल्याला गोधन निवास असे नाव दिले आहे. अशाप्रकारे कष्टाच्या जोरावर त्यांनी व्यवसाय उभा केला व तो यशस्वी देखील केला आहे.