Ghonas Snake:- भारतामध्ये सापाच्या अनेक प्रजाती आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यातील घोणस, इंडियन कोब्रा तसेच मन्यार यासारख्या जाती अति विषारी म्हणून ओळखले जाते. प्रत्येक सापाच्या प्रजातीचे वेगवेगळे वैशिष्ट्ये असून त्या पद्धतीने त्यांचा वावर असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर मन्यार हा विषारी साप निशाचर म्हणून ओळखला जातो.
म्हणजेच हा साप रात्रीच्या वेळी जास्त करून बाहेर फिरतो व अन्नाच्या शोधार्थ घरांमध्ये शिरतो. खाली झोपलेल्या व्यक्तीच्या अंथरुणामध्ये शिरून चावा घेतो व या सापाने चावा घेतल्याचे व्यक्तीला कळत देखील नाही व झोपेतच मृत्यू होतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रजातींचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. अगदी त्याच पद्धतीने जर आपण घोणस या जातीच्या सापाचा विचार केला तर थंडीच्या कालावधीमध्ये या जातीच्या सापापासून विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
थंडीच्या कालावधीत घोणस सापापासून सावधगिरी बाळगा
सध्या हिवाळ्याची चाहूल लागली असून अंगाला हुडहुडी भरवणारी थंडी जाणवू लागली आहे. याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोणस प्रजातीचा साप दृष्टीस पडायला लागतो. कारण हा कालावधी म्हणजेच थंडीचा कालावधी घोणस प्रजातीच्या सापांचा मिलन काळ असतो. जर आपण या सापाचा विचार केला तर याची लांबी ही तीन ते पाच फूट असते व डोके मोठे, सपटे व त्रिकोणी आणि मानेपासून वेगळे असल्याचे दिसते.
घोणस जातीच्या सापाच्या डोक्यावर व पाठीवर लहान लहान आकाराचे खवले दिसून येतात व या जातीच्या सापाची शेपूट लहान असते. या जातीच्या सापाच्या पाठीकडचा रंग हा फिकट ते गडद तपकिरी असतो व प्रत्येक ठिपक्याच्या कडेला पांढरी किनार असते. घोणस सापाच्या पोटाचा रंग फिकट पांढरा असून त्यावर रुंद व आडवे अशी पट्टे असतात.
जेव्हा घोणस साप फुत्कारतो तेव्हा एखाद्या मोटारीच्या चाकातील हवा सोडल्यानंतर जसा आवाज होतो तसा आवाज येतो. जर आपण इतर प्रजातींच्या सापांचा विचार केला तर त्यांच्या तुलनेमध्ये हा आकाराने मोठा असतो. बेडूक तसेच सरडे व उंदीर मोठ्या प्रमाणावर घोणस सापाचे भक्ष्य असल्यामुळे जमीन व त्या लगतच्या भागात किंवा लोकवस्तीमध्ये देखील हा आढळून येतो.
घोणस जातीचा साप हा पहाटे पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस जास्त बाहेर फिरतो किंवा दिवसादेखील निर्धास्तपणे फिरत असतो. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे हा माणसाच्या वाटेला जास्त करून जात नाही. समजा एखाद्या वेळेस त्याने हाताला किंवा पायाला चावा घेतला तर ताबडतोब रुग्णालयामध्ये जाऊन प्रतिविष टोचून घेणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. घोणस प्रजातीच्या सापाच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा रक्त कोशिका फुटण्याची शक्यता असते. किडनी निकामी होण्याची देखील शक्यता असते. घोणस जातीच्या सापाच्या विषाचा वापर हा मेडिकल रिसर्च मध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.