Real Estate:- बऱ्याचदा अनेकजण घर विकत घेण्याचा प्लॅन करतात. यामध्ये काहीजण गुंतवणूक करण्याकरिता प्रॉपर्टी अर्थात घर खरेदीमध्ये गुंतवणूक करतात तर काही जन स्वतः राहण्यासाठी घराची खरेदी करतात किंवा घर विकत घेतात. प्रामुख्याने घर किंवा प्लॉट घेताना त्या जागेचे लोकेशन, ज्या ठिकाणी घर घ्यायचे आहेत त्या ठिकाणचा विकास कसा झाला आहे? किंवा येणाऱ्या भविष्यकाळात किती वेगाने विकास होऊ शकतो?
त्या ठिकाणी असलेल्या पायाभूत सुविधा, शाळा तसेच कॉलेज, रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॅन्ड, हॉस्पिटल इत्यादी सुविधा किती अंतरावर आहेत हे देखील प्रामुख्याने पाहिले जाते व त्यानुसारच घर खरेदीचा निर्णय घेतला जातो. गुंतवणुकीकरिता जर घर किंवा प्लॉट खरेदी करायचा असेल तर किती दिवसांमध्ये हा परिसर विकसित होऊ शकतो याला देखील खूप महत्त्व असते व या सगळ्या बाबी डोळ्यासमोर ठेवूनच घर खरेदीचा निर्णय घेतला जातो.
यातीलच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घर खरेदी करणे हा महत्त्वाचा निर्णय बरेच जण घेतात परंतु घर खरेदी करताना शहरांमध्ये घ्यायचे असेल तर नवीन फ्लॅट किंवा नवीन घर घ्यावे की जुने घर घ्यावे हा देखील एक मोठा प्रश्न असतो. कारण जुने घर आणि नवे घर खरेदीमध्ये बऱ्याच गोष्टींची तफावत आणि फायदे तोटे दिसून येतात. या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये घर जर खरेदी करायचे असेल तर नेमके ते जुने घ्यावे की नवीन? याबद्दल महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
जुने घर विकत घेण्याला दिसून येते पसंती
घर विकत घ्यायचे असेल तर जुने घ्यावे की नवे याबाबतीत बराच गोंधळ उडताना दिसतो. परंतु काही वर्षांचा विचार केला तर बरेच लोक जुना फ्लॅट किंवा घर खरेदी करण्याला जास्त पसंती देताना दिसून येत आहेत. तसेच असे जुने फ्लॅट किंवा घर खरेदी करण्याकरता बांधकाम व्यवसायिकांकडून देखील खरेदीदार आकर्षक व्हावे
त्याकरिता अनेक नवनवीन प्रकल्प तसेच आकर्षक ऑफर दिल्या जातात. परंतु गुंतवणुकीच्या दृष्टीतून जुने घर विकत घ्यावी की नवीन घर याबाबतीत गोंधळ उडतो कारण दोन्ही प्रकारच्या व्यवहारांमध्ये फायदे आणि तोटे आहेत. तसेच यामध्ये तुमचा बजेट आणि लोकेशन यावर देखील बऱ्याच बाबी अवलंबून असतात.
नवीन घर विकत घ्याल तर काय होतील फायदे?
समजा तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी नव्हे तर राहण्यासाठी घर हवे असेल तर तुम्ही खूप मागचा पुढचा विचार करून निर्णय घेणे यामध्ये आवश्यक आहे. कारण घरासारखी प्रॉपर्टी परत परत घेतली जाऊ शकत नाही. यामध्ये बरेच बिल्डर्स घरात गुंतवणूक करू पाहणाऱ्या खरेदीदारांसाठी अनेक प्रकारच्या ऑफर देतात.
नवीन घराचा विचार केला तर यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या असतात व सर्व काही नवीन रचना असल्यामुळे या शहरांचा देखभालीचा खर्च देखील वाचतो. त्यामुळे राहण्यासाठी जर घर घ्यायचे असेल तर नवीन फ्लॅट खरेदी करणे हा एक चांगला निर्णय असू शकतो.
नवीन घर खरेदी करण्याचे हे आहेत तोटे
नवीन घर खरेदी करायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जुन्या घरांपेक्षा किंवा जुन्या फ्लॅटपेक्षा नवीन घराची किंवा फ्लॅटची किंमत जास्त असते. तसेच अविकसित असलेल्या एरियामध्ये जर तुम्ही मालमत्ता घेत असाल तर ती पूर्ण विकसित होण्यासाठी चार ते पाच वर्षे लागतील किंवा त्यापेक्षा जास्त देखील वेळ लागू शकतात. त्या तुलनेमध्ये जर तुम्ही जुना फ्लॅट किंवा जुने घर खरेदी केले तर नवीन घरची खरेदीपेक्षा तुम्हाला याकरिता खूप कमी खर्च येतो. परंतु नवीन घराच्या तुलनेत जुन्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या देखील येऊ शकतात.
जुने घर खरेदी करण्याचे तोटे
समजा तुम्ही जुने घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याचा विचार केला तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे याकरिता तुम्हाला मेंटेनन्स वर काही खर्च करावा लागू शकतो. तसेच अशी प्रॉपर्टी जर अनेक वेळा तिची खरेदी विक्री झाली असेल तर डॉक्युमेंट मध्ये देखील काही समस्या येऊ शकतात. समजा तुम्हाला घर घ्यायचे आहे परंतु भाड्याने देण्यासाठी तुम्हाला जर घराची खरेदी करायची असेल तर तुमच्या करिता जुना फ्लॅट घेणे खूप फायद्याचे ठरते.
परंतु तरीदेखील तुम्ही जुने घर किंवा फ्लॅट घेण्याअगोदर ते कशा प्रकारचे बांधकाम आहे म्हणजेच त्याची गुणवत्ता कशा प्रकारची आहे हे नीट पाहून सदर व्यवहार करणे गरजेचे आहे तसेच संबंधित घर किंवा फ्लॅटचे कागदपत्रे व्यवस्थित तपासून घेऊनच निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. नाहीतर नंतर उगीचच पश्चाताप करण्याची वेळ येते. तसेच तुम्ही कुठल्याही ठिकाणी जर फ्लॅट किंवा घर खरेदी करत असाल तर या ठिकाणचा परिसर आणि वाहतूक व इतर पायाभूत साधने कशा पद्धतीचे आहेत याची परिपूर्ण माहिती घेणेदेखील गरजेचे आहे.