महाराष्ट्रातील ठाकरे घराणे म्हटले म्हणजे सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो त्यांचा शिवसेना पक्ष. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली आणि मराठी माणसांचे प्रश्न सोडवण्याकरिता हा पक्ष झटला. ही झाली ठाकरे घराण्याची राजकीय बाजू. परंतु या व्यतिरिक्त ठाकरे घराणे हे कला क्षेत्रामध्ये देखील खूप पुढे आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे साहित्यकार होते तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वतः उत्तम प्रतीचे व्यंगचित्रकार होते.
तसेच आता उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीचा मोठ्या प्रमाणावर छंद असून राज ठाकरे हे देखील उत्तम व्यंगचित्रकार असून कलेचे भोक्ते आहेत. परंतु याच घरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सुपुत्र तेजस ठाकरे हे कायम निसर्गाच्या आणि डोंगरदर्यांच्या सानिध्यात रमणारे व्यक्तिमत्व आहे. कायमच रानावनामध्ये रमणारे तेजस ठाकरे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि विविध प्राणी, कीटक यांच्या प्रजाती शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभ्यास करतात. याचीच एक परिणीती म्हणून नुकतेच तेजस ठाकरे व त्यांच्या टीमने चक्क सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.
तेजस ठाकरे यांनी लावला सापाच्या नव्या प्रजातीचा शोध
उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे व त्यांच्या टीमने पश्चिम घाटातील निसर्गात वास्तव्य करणाऱ्या सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला असून या सापाला सह्याद्रीओफिस उत्तराघाटी असे नाव देण्यात आलेले आहे. तेजस ठाकरे यांच्यासोबत या टीम मध्ये हर्षील पटेल व कॅम्पबेल आणि झिशान मिर्झा यांचा समावेश होता.
सापाला सह्याद्रीओफिस हे नाव का देण्यात आले?
सापाच्या नवीन शोध लागलेल्या या प्रजातीला हे नाव देण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे पश्चिम घाटाकरिता प्रामुख्याने सह्याद्री हा शब्द वापरला जातो. सह्याद्री या संस्कृत शब्दाचा आणि ओफीस या सापांसाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रीक शब्द एकत्र करून हे नाव देण्यात आले आहे. तसेच या प्रजातीला उत्तराघाटी असे देखील नाव देण्यात आले असून यामध्ये उत्तरा हा शब्द उत्तर दिशा दर्शवतो तर घाटी हा शब्द डोंगर रांगातील किंवा पर्वतातील रहिवास किंवा रहिवासी अशा संदर्भात वापरण्यात आलेला असून सापाच्या या प्रजातींचे घाटातील उत्तरेकडील असलेले वास्तव्य किंवा निवास दर्शवते.
याबद्दल तेजस ठाकरे यांनी म्हटले की अशा प्रकारचा अभ्यास हा आपल्या घाटांच्यामध्ये असलेली जी काही जैवविविधता आहे त्याबद्दल समजून घेण्यामध्ये खूप मदत करतो. तसेच हे क्षेत्र मानवजाती करिता अद्याप खूप रहस्यमय असल्याचे देखील ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने म्हटल आहे. एवढेच नाही तर या अगोदर देखील तेजस ठाकरे यांनी या क्षेत्रामध्ये अद्भुत असे काम केले असून मासे तसेच खेकडे आणि इतकेच नाही तर पाली असे मिळून विविध 11 पेक्षा अधिक दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावला असून त्यांना नवीन ओळख देखील मिळवून दिली आहे.