नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची समीक्षा करणे गरजेचे होते; परंतु राहुल गांधी यांनी ऐनवेळी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतरही आम्ही त्यांच्याबद्दल निष्ठा दाखविली. त्यामुळेच पक्षाची दैना झाली, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी पक्षाची दयनीय स्थिती बुधवारी उजागर केली आहे. काँग्रेस सध्या अडचणीत आहे. अशावेळी निवडणूक जिंकणे तर सोडाच, पण पक्षाचे अस्तित्व टिकविणे कठीण झाले आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसच्या संकटावर उघडपणे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, लागोपाठ दोन मोठ्या पराभवांमुळे काँग्रेसचे प्रचंड खच्चीकरण झाले. तरीही पक्ष नेतृत्वाने पराभवाची समीक्षा करण्याची तसदी घेतली नाही. याउलट राहुल गांधी यांनी राजीनामा देत पळ काढल्याने मोठी अडचण झाली आहे.
पण दुर्दैवाने ऐनवेळी पक्षाने नेतृत्व गमावले. त्यामुळे पक्षात पोकळी निर्माण झाली व पराभवाची समीक्षा होऊ शकली नाही. म्हणून पक्षापुढे भीषण स्थिती निर्माण झाली, अशा शब्दांत खुर्शीद यांनी पक्षाला घरचा अहेर दिला. राहुल गांधी राजीनामा देण्यावर ठाम होते. तुम्ही पक्षाध्यपद सोडू नका, असा आग्रह आम्ही त्यांना वारंवार केला; परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही, असेही खुर्शीद यांनी नमूद केले. देशातील वारे बदलले आहे. बदलत्या परिस्थितीत नागरिकांच्या दृष्टिकोनाकडे डोळसपणे बघणे गरजेचे आहे.
पक्षाला उतरती कळा लागण्याची खरी कारणे शोधली पाहिजेत. पराभवाची मिमांसा करून दमदारपणे वाटचाल करणे अपेक्षित आहे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र, हरयाणा व झारखंड विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. यात चांगली कामगिरी बजावत पक्षाला नवी उभारी देऊ, असेही सलमान खुर्शीद यांनी पुढे बोलताना म्हटले आहे. काँग्रेसपुढील स्थिती चिंताजनक आहे. जबाबदाऱ्या ढकलल्याने परिस्थिती आणखी खडतर होईल. त्यामुळे काँग्रेसमध्ये उच्च स्तरावर चिंतन झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
- Cheapest electric car : १ लाखांत इलेक्ट्रिक कार ! सिंगल चार्जवर किती चालणार ?
- Artificial Intelligence मध्ये करिअर कराल तर लाखो कमवाल ! अशी आहे करिअरची मोठी संधी!
- शेतजमीन किंवा मालमत्तेवर अतिक्रमण झालाय का? ‘या’ मार्गांचा वापर करा आणि स्वतःचा हक्क मिळवा
- शक्तीपीठ महामार्ग नियोजित मार्गानुसारच होणार! दोन महिन्यात मोजणी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
- FasTag Rules Change : फास्टॅग नियमांमध्ये १ एप्रिल २०२५ पासून बदल !