Agriculture News : महाराष्ट्रात केल्या काही दिवसांपासून पीक विमा विरोधात रान पेटले आहे. खरं पाहता पिक विमा प्रीमियम म्हणून शेतकरी बांधवांनी हजारो रुपये रक्कम भरली असताना त्यांना मात्र वीस-तीस रुपये अशी नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता चालू मामला वडवणी तालुक्यातून समोर आला आहे.
वडवणी तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याने 1296 रुपये पिकविम्यासाठी भरले होते मात्र त्या महिला शेतकऱ्याला आता नुकसान भरपाई म्हणून केवळ बारा रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तालुक्यातील महिला शेतकरी संगीता अशोक दोताडे यांच्या बाबतीत हा किस्सा घडला आहे. यामुळे एवढ्या पैशांचे करायचे काय आणि पिक विमा हा नेमका शेतकऱ्यांसाठी आहे की कंपन्यांसाठी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
खरं पाहता नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास पिकाला संरक्षण म्हणून पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना निदान नुकसानीपोटी थोडासा आर्थिक दिलासा मिळेल अशी आशा असते. हजारो रुपयांचा पिक विमा काढून अवघे दहा-वीस रुपये पिक विमा नुकसान भरपाई जर मिळत असेल मग हा पिक विमा आहे की भीकविमा हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होणे साहजिकच आहे.
दरम्यान पीक विमा विरोधात शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस वाढत असून तूटपुंजी मिळत असलेल्या नुकसान भरपाई विरोधात अनेक शेतकरी संघटनांकडून आवाज बुलंद केला जात आहे. दरम्यान वडवणी तालुक्यातील जवळपास 40,000 शेतकरी बांधवांनी पीक विम्याचे संरक्षण घेतले आहे. बजाज एलियन जनरल इन्शुरन्स या पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवला आहे.
वडवणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना वाजवी नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र सुरुवातीला कंपनीने चक्क नुकसान झालेलं नसल्याचे कारण पुढे करत नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली. मात्र त्यानंतर शेतकरी राजा उठला, आंदोलन केल अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि मग कुठे पिक विमा कंपनीला घाम फुटला आणि पिक विमा नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास सुरुवात झाली.
मात्र आता नुकसान भरपाई अवघी दहा-वीस रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होत असल्याने बळीराजाची ही क्रूर चेष्टा विमा कंपन्यांकडून माजवली जात असल्याचे चित्र आहे. खरं पाहता, एखाद्या शेतकऱ्याने दाखल केलेल्या सर्व पिक विमा अर्जाच्या नुकसान भरपाई पोटी जर ₹1000 पेक्षा कमी पैसे संबंधित शेतकऱ्याला मिळत असतील तर राज्य शासनाकडून त्यामध्ये पैसे टाकले जातात अन किमान एक हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जातात. या संबंधात शासन निर्णय देखील आला आहे. मात्र शासन निर्णयाची पायमल्ली शासनाकडूनच केली जात असल्याचे चित्र आहे.