व्यक्तीला शारीरिक किंवा कौटुंबिक किंवा सामाजिक कितीही प्रकारच्या मर्यादा किंवा बंधने असली तरी व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी करण्याची अफाट जिद्द आणि उर्मी असेल तर व्यक्ती कुठल्याही गोष्टींना न जुमानता यशाचे शिखर गाठतोच. जर आपण कौटुंबिक किंवा सामाजिक इत्यादी प्रकारच्या मर्यादांचा विचार केला तर यांच्यापेक्षा शारीरिक दृष्टिकोनातून जर काही अपंगत्व असले तर मात्र खूप मोठ्या प्रमाणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
परंतु समाजामध्ये असे अनेक व्यक्ती आपण पाहिले असतील की शारीरिक अपंगत्व किंवा शारीरिक मर्यादा असताना देखील त्यांनी प्रचंड कष्टाने खूप मोठे यश मिळवलेले आहे. असे व्यक्ती आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येतात व याला कृषीक्षेत्र देखील अपवाद नाही. कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला धाराशिव जिल्ह्यातील एकुरका या गावच्या एका तरुण शेतकरी व एका पायाने अपंग असून देखील केळी लागवडीतून जे काही यश मिळवले आहे ते वाखाणण्याजोगे आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
अमोल यादव यांनी फुलवला केळीचा बाग
याबद्दलचे सविस्तर सविस्तर वृत्त असे की, धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेल्या एकुरका या गावचे अमोल राजाभाऊ यादव यांचे नववी पर्यंत शिक्षण झाले असून विशेष म्हणजे ते एक पायाने अपंग आहेत. परंतु या शारीरिक मर्यादेवर मात करत पुण्यामध्ये ते एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते. हे काम व्यवस्थित चालू असताना जगात कोरोनाने थैमान घातले व अनेक जणांना आपली नोकरी कमवावी लागली व असाच प्रकार अमोल त्यांच्यासोबत देखील घडला.
कोरोनामुळे नोकरी गेल्यानंतर आता काय करावे हा प्रश्न समोर असताना त्यांनी गाव गाठले व घरी आल्यावर शेतीमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली. परंतु शेती करायची तर परंपरागत पिकांची लागवड न करता काहीतरी नवीन करावे या उद्देशाने त्यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केली व व्यवस्थित नियोजन व कष्टाने त्यांनी केळीचे बाग फुलवली.
मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बागेला पाण्याचा तुटवडा भासू लागला व त्याकरिता त्यांनी अक्षरशः टँकरच्या साह्याने पाणी आणून बागेला पुरवले. सर्व प्रकारची व्यवस्थित काळजी आणि मेहनत घेतली व त्यांचे फळ त्यांना आता मिळाले असून त्यांची केळी विक्रीसाठी थेट दुबई आणि इराक या देशांमध्ये पाठवण्यात आली असून या केळी विक्रीतून त्यांना लाखो रुपयांचा नफा मिळाला आहे.
दुसरी महत्त्वाचे बाब म्हणजे पिकाचे व्यवस्थित नियोजन करत त्यांनी या केळी बागेमध्ये कोबी या भाजीपाला पिकाचे आंतरपीक म्हणून लागवड केली व त्या माध्यमातून देखील त्यांनी लाखो रुपये मिळवले. कुटुंबाची मदत घेऊन आधुनिक पद्धतीने केळी बागेची लागवड करण्याचा अमोल यांचा निर्णय योग्य ठरला आहे.
केळी बागेचे संपूर्ण नियोजन करताना त्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले व त्यानुसार सगळे नियोजन केले. एवढेच नाही तर फळबागांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा देखील त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. या सगळ्या प्रयत्नातून त्यांनी आज दाखवून दिले की शारीरिक मर्यादा कितीही राहिली तरी जर मनामध्ये इच्छा असेल आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जर काही करायचे ठरवले तर नक्कीच यश मिळते हे अमोल यांच्या उदाहरणावरून दिसून येते.