Banana Farming:- शेतकरी प्रचंड प्रमाणात कष्ट करून भरघोस उत्पादन मिळवतात. परंतु जेव्हा हा कष्टाने पिकवलेला शेतीमाल बाजारपेठेमध्ये विक्रीला नेतात तेव्हा मात्र कवडीमोल दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची पूरती निराशा होते. शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागत नाही.
कधी कधी तर वाहतूक खर्च देखील निघणे मुश्किल होते अशी स्थिती होते. जर शेतकऱ्यांना या परिस्थितीतून किंवा या समस्येपासून मुक्तता मिळवायची असेल तर शेतीमालावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून त्यापासून प्रक्रियायुक्त उत्पादने निर्माण करणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून या उत्पादनांना बाजारपेठेत मागणी देखील चांगली असते व एकदा केलेल्या गुंतवणुकीतून कायमस्वरूपी शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊ शकतो.
याच मुद्द्याला धरून जर आपण जळगाव जिल्ह्यातील एका केळी उत्पादक शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली असून केळीवर आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले आहेत.
या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत केळीपासून सहा प्रकारची उत्पादने तयार केलेली आहेत. सध्या या शेतकऱ्याने केळीपासून बिस्किटे बनवण्याचा शोध लावला असून त्यासाठी त्यांना त्याचे पेटंट देखील मिळाले आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
केळीपासून बनवले बिस्कीट
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील रहिवासी असलेले अशोक गाढे यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. या परिसरामध्ये केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व त्यामुळे बऱ्याचदा केळीला बाजारपेठेमध्ये अत्यल्प दर मिळतो.
असाच अनुभव गाढे यांना देखील बऱ्याचदा आला. परंतु यामध्ये त्यांनी हार न मानता केळीवर वेगवेगळे प्रयोग केले व उत्पादने तयार केली व संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची विक्री आता केली जात आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे बाजारामध्ये केळी पापड, लाडू तसेच टॉफी आणि आता बिस्किटाच्या स्वरूपात बाजारात उपलब्ध झाली आहे. अशोक गाढे व त्यांची कुटुंबियांनी केळी पासून हे उत्पादने तयार करण्याचा उद्योग सुरू केला असून स्वतःच्या आर्थिक प्रगती सोबतच इतरांना रोजगार देखील त्यांनी मिळवून दिलेला आहे.
उच्चशिक्षित असून देखील शेती करण्याचा निर्णय
अशोक गाढे हे कायद्याचे पदवीधर असून त्यांनी एलएलबीची पदवी मिळवली आहे व पाच वर्षे प्रॅक्टिस देखील केली. परंतु 1990 यावर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले व त्यांना वकिलीची प्रॅक्टिस सोडावी लागली. त्यानंतर घरची पाच एकर शेती त्यांनी कसायला सुरुवात केली.
त्यांच्या शेतामध्ये आजोबा आणि त्यांच्या वडिलांपासून केळीची लागवड केली जात होती परंतु जेव्हा जेव्हा केळी बाजारपेठेत विक्रीसाठी जायची तेव्हा कवडीमोल दर मिळायचा. त्यामुळे या केळीची शेती फायदेशीर का नाही याचा शोध घेत असताना तसेच बऱ्याचदा केळी साठवता येईल का याचा देखील प्रयत्न त्यांनी केला.
परंतु यामध्ये देखील त्यांना यश मिळाले नाही. केळी हे नाशवंत पीक असल्यामुळे माल तयार झाल्याबरोबर त्याची विक्री करणे आवश्यक असल्यामुळे आहे त्या भावात त्यांना तिची विक्री करावी लागत होती. या समस्या मधूनच विचार करत असताना केळीवर काही प्रक्रिया करता येईल का याचा शोध घेत होते व त्यानुसार त्यांनी अनेक दिवस प्रयोग केले.
केळीवर प्रक्रिया करून बनवली विविध उत्पादने
या प्रयत्नातून त्यांनी प्रक्रिया करून केळीचे चिप्स, केळीचा जाम, कॅंडीज तसेच पापड, चिवडा आणि लाडू यासारखे केळीपासून पदार्थ बनवले. यामध्ये प्रयोग करत असतानाच त्यांनी केळ्यांपासून बिस्किट बनवण्याचा शोध देखील लावला व गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये केंद्र सरकारकडून त्यांना त्यांच्या या केळीच्या बिस्किटांचे पेटंट देखील देण्यात आलेला आहे.
साधारणपणे 2010 पासून ते केळी पासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करत आहेत व या प्रयत्नांमध्ये असतानाच त्यांना 2019 मध्ये केळी पासून बिस्किट बनवण्याचा शोध लागला. नक्कीच या शोधाचा फायदा त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांना देखील फायदेशीर ठरला आहे.
त्यांनी जे काही प्रॉडक्ट बनवलेले आहे ते ऑनलाईन तसेच फ्रेंचाईजीच्या माध्यमातून विक्री केली जातात. विशेष म्हणजे त्यांच्या ग्राहकांमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत असून हे सगळे उत्पादने ऑरगॅनिक असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ते विक्री होत असल्याचे देखील अशोक गाढे यांनी सांगितले. यावरून आपल्याला दिसून येते की जर शेतीमध्ये देखील विविध प्रयोग आणि प्रयत्न करत राहिले तर शेती देखील खूप चांगल्या पद्धतीने पैसा मिळवून देऊ शकते.