Chilli Crop Variety:- महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात असून यामध्ये हिरव्या मिरचीची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रमध्ये नंदुरबार जिल्हा हा मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध असून त्या खालोखाल कमी अधिक प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हिरवी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात.
साहजिकच हिरव्या मिरचीचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच कीड व रोग व्यवस्थापनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या पद्धतीने सगळ्या व्यवस्थापनाच्या बाजू चोखपणे पूर्ण केल्या तर कुठल्याही पिकाचे उत्पादन भरघोस येते.
परंतु सगळ्यात महत्वाचे असते म्हणजे तुम्ही ज्या ही पिकाची लागवड करणार आहात त्या पिकाच्या दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणाची लागवड करणे हे होय. कारण वाण दर्जेदार नसेल तर तुम्ही कितीही व्यवस्थापन चोख ठेवले तरी देखील उत्पादनाला फटका बसतो
व हीच बाब हिरव्या मिरचीच्या बाबतीत देखील लागू होते. त्यामुळे तुम्हाला देखील हिरव्या मिरचीची लागवड करायची असेल तर दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणाची लागवड करणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून आपण या लेखामध्ये हिरव्या मिरचीच्या काही प्रमुख वाणाची माहिती बघणार आहोत.
हिरव्या मिरचीचे हे वाण देतील भरघोस उत्पादन
1- महिको तेज 4- महिकोची मिरचीची ही जात उत्पादनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून हिचा वापर भाजीपाला आणि मसाल्यांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. या मिरचीच्या प्रजातीची मिरची ही रंगाने लाल आणि चमकदार असतेच.परंतु उत्पादन देखील जास्त देते. दिसायला आकर्षक असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळतो
व मागणी देखील चांगली असते. तसेच हिरव्या मिरचीचा हा वाण रोग आणि किडींच्या प्रादुर्भावाला जास्त करून बळी पडत नाही. त्यामुळे साहजिकच कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो. मिरचीच्या या वाणापासून एका हेक्टरमध्ये 90 ते 160 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
2- बायोसिड अजंता हॉट– हा हिरवा मिरचीचा एक महत्त्वाचा वाण असून विषाणूजन्य रोगांसाठी सहनशील आहे. या प्रजातीवर फळकिडींचा म्हणजेच फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत नाही.
लाल मिरचीच्या उत्पादनासाठी हा वाण खूप उत्तम आहे. या वाणाची मिरची दिसायला खूप आकर्षक असते व एका मिरचीचे वजन सहा ते सात ग्रॅम पर्यंत असते. या वानाची मिरची खायला खूप तिखट असते. मसाला बनवण्यासाठी मिरचीचा हा वाण मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
3- व्हीएनआर राणी 332 एफ1 हायब्रीड– हा देखील मिरचीचा वाण भरघोस उत्पादनासाठी उत्तम समजला जातो. दर्जेदार गुणवत्ता आणि भरघोस उत्पादन या वाणाची प्रमुख ओळख आहे.
या वाणाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लागवडीनंतर हा काढणीला लवकर येतो. तसेच मिरचीचा हा वाण खूप तिखट समजला जातो. या वाणाची मिरची लांबीने 12 ते 15 cm पर्यंत असते व हेक्टरी 80 ते 150 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
4- सिजेंटा हॉट एचपीएच 5531- हिरव्या मिरचीचा हा वाण देखील लागवडीनंतर लवकर काढणीला येतो व लवकरात लवकर हातात उत्पादन मिळाल्याने चांगला बाजारभाव मिळण्यास देखील मदत होऊ शकते.
ही मिरची चवीने मध्यम तिखट असून 15 cm पर्यंत या वाणाची मिरची लांब असते. हेक्टरी 90 ते 140 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. मिरचीच्या या वाणाची लागवड खरीप हंगामात केली जाते.