Cow Farming Tips : भारतात पशुपालन हा एक मुख्य व्यवसाय आहे. शेतीला पूरक व्यवसाय असल्याने या व्यवसायाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पशुपालनात आपल्याकडे सर्वाधिक गाईंचे संगोपन केले जाते. गाई पालनातून निश्चितच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळते.
पशुपालन हा मुख्यत्वे दुग्ध उत्पादनासाठी केला जातो यामुळे पशुपालनात उच्च प्रतीच्या गाई म्हशींच्या जातींचे पालन केले पाहिजे जेणेकरून दुग्ध उत्पादन वाढेल आणि पशुपालकांना चांगले उत्पन्न मिळेल.
![cow farming tips](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/12/WhatsApp-Image-2022-12-25-at-3.06.36-PM.jpeg)
यामुळेच गोपालन करणाऱ्या पशुपालकांना देखील गायीच्या सुधारित जातींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत आज आपण गाईच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेली फुले त्रिवेणी जाती विषयी जाणून घेणार आहोत. फुले त्रिवेणी ही गाईची एक सुधारित जात आहे. या गाईची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही होलस्टेन फ्रीजियन ५० टक्के, जर्सी २५ टक्के व गीर २५ टक्के या जातींचा संकर आहे. यामुळेच या गाईला फुले त्रिवेणी असे नाव देण्यात आले आहे.
फुले त्रिवेणी गाईचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :-
फुले त्रिवेणी ही गाय दुग्धोत्पादनासाठी विशेष ओळखली जाते. ही जात एका वेतात 3000 ते 3500 लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असते.
या जातीची रोगप्रतिकारक्षमता ही इतर जातींच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा केला जातो. यामुळे पशुपालकांना निश्चितच फायदा होणार आहे.
याव्यतिरिक्त या जातीची एक मोठी विशेषता आहे या जातीचे पिढ्यानपिढ्या दुग्ध उत्पादन हे सारखेच राहते. म्हणजे मूळ जातीची गाय जेवढे उत्पादन देते तिची पुढील पिढी देखील तेवढे उत्पादन देण्यास सक्षम असते.
या जातीचे वळुंचे गोठीत वीर्य महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी उपलब्ध असते.
निश्चितच या जातीच्या गाईंमध्ये अधिक दूध देण्याची क्षमता असल्याने आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हवामानात या जातीचे संगोपन फायदेशीर असल्याने गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या जातीचे संगोपन करण्याचा सल्ला जाणकार लोकांकडून दिला जातो.