Dragon Fruit Cultivation:- शेतीमध्ये आता बदलाचे वारे मोठ्या प्रमाणावर वाहायला लागले असून तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या फळ पिकांच्या लागवडीच्या माध्यमातून आता शेतीचे संपूर्ण रूपच पालटून गेलेले आहे व खऱ्या अर्थाने आता शेती व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात आहे.
शेतकरी आता पारंपारिक पिकांऐवजी विविध प्रकारची फळपिके तसेच भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले असून या शेतीला पोल्ट्री, डेरी व्यवसायाची जोड देऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक उन्नती साधताना आपल्याला दिसून येत आहेत.फळबागांच्या दृष्टिकोनातून बघितले तर गेल्या चार ते पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढत असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसून येत आहे.
ड्रॅगन फ्रुट हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे असल्याने याला बाजारपेठेत देखील चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या दृष्टिकोनातून ड्रॅगन फ्रुट खूप फायद्याचे ठरत आहे.
अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले शेतकरी आता ड्रॅगन फ्रुट लागवड करू लागले असून त्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधत आहेत. याच पद्धतीने जर आपण महाराष्ट्रातील भात पिकाचा पट्टा म्हणून ओळखला जाणारा गोंदिया जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या जिल्ह्यांमध्ये देखील आता शेतीमध्ये बदलाचे वारे व्हायला लागले
असून या ठिकाणचे शेतकरी देखील आता फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. अगदी याच पद्धतीने गोंदिया तालुक्यात असलेल्या मजितपुर या गावचे रहिवासी असलेले प्रयोगशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी तब्बल दहा एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट लागवडीचा प्रयोग केला व तो यशस्वी करून दाखवला आहे.
भालचंद्र ठाकूर यांनी दहा एकरवर ड्रॅगन फ्रुट लागवडीचा प्रयोग केला यशस्वी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोंदिया तालुक्यात असलेल्या मजीतपूर येथील प्रयोगशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी पारंपारिक भातशेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निर्णय घेतला व तब्बल दहा एकर क्षेत्रावर त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीचा प्रयोग यशस्वी केलेला आहे.
इतकेच नाही तर या पिकापासून ते भरघोस असे उत्पादन मिळवत असून लाखोत आर्थिक उत्पन्न मिळवण्याची किमया त्यांनी साध्य केलेली आहे. भालचंद्र ठाकूर हे प्रामुख्याने जैविक शेतीमध्ये खूप प्रसिद्ध असून त्यांनी ड्रॅगन फ्रुट सारख्या विदेशी फळाचा प्रयोग करण्याचे ठरवले व दहा एकर शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.
आपल्याला माहित असेलच की जगातील व्हिएतनाम तसेच श्रीलंका व थायलंड सारख्या देशांमध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. हळूहळू आता भारतामध्ये देखील याची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असून मागणी देखील दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
विशेष म्हणजे भात पिकापेक्षा ड्रॅगन फ्रुटला खूप कमी पाण्याची गरज भासते. त्यामुळे कमी पाण्याच्या नियोजनात देखील शेतकरी उत्तम पद्धतीने याचे उत्पादन घेऊन चांगला पैसा मिळवू शकतात. तसेच कमी कालावधीत विकसित होणारे आणि उत्पादन देणारे हे फळपीक असल्यामुळे ड्रॅगन फ्रुट लागवडीचा शेतकऱ्यांना फायदा होतो.
भालचंद्र ठाकूर यांनी देखील कमीत कमी पाणी आणि खर्चात ड्रॅगन फ्रुटची बाग आज फुलवली आहे व आर्थिक नफा मात्र मोठ्या प्रमाणावर ते मिळवत आहेत. विशेष म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर दहा ते पंधरा वर्षांपर्यंत हे पीक उत्पन्न देत असल्याने लागवडीचे वर्ष सोडले तर त्या पुढील काळामध्ये कमी खर्चात जास्तीचा नफा या माध्यमातून मिळतो.