रब्बी हंगामात भारी आणि बागायती जमिनीत ज्वारीच्या ‘या’ वाणांची लागवड म्हणजेच पैशांची गंगा येईल घरी! मिळेल भरघोस उत्पादन

ज्वारी या पिकाच्या लागवडीपासून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. म्हणजेच धान्याचे उत्पादन तर मिळतेच परंतु चाऱ्याचे उत्पादन देखील मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा या पिकापासून मिळतो. तसेच रब्बी ज्वारीची उत्पादन क्षमता ही तुलनेमध्ये इतर पिकांपेक्षा जास्त आढळून आल्याने शेतकरी बंधूंसाठी ज्वारीची लागवड ही फायद्याची ठरताना दिसून येत आहे.

Ajay Patil
Published:
jowar crop variety

Jowar Crop Variety:- रब्बी हंगामाला सध्या सुरुवात झाली असून शेतकरी बंधू आता खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामाच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा तसेच मका या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते व त्या खालोखाल कांदा पिकाची लागवड देखील केली जाते.

परंतु गेल्या काही वर्षांपासून जर आपण बघितले तर रब्बी हंगामामध्ये ज्वारी लागवडीचे प्रमाण देखील आता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. तसे पाहायला गेले तर खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारीची लागवड केली जायची. परंतु आता रब्बी हंगामामध्ये देखील ज्वारीच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे.

ज्वारी या पिकाच्या लागवडीपासून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. म्हणजेच धान्याचे उत्पादन तर मिळतेच परंतु चाऱ्याचे उत्पादन देखील मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा या पिकापासून मिळतो.

तसेच रब्बी ज्वारीची उत्पादन क्षमता ही तुलनेमध्ये इतर पिकांपेक्षा जास्त आढळून आल्याने शेतकरी बंधूंसाठी ज्वारीची लागवड ही फायद्याची ठरताना दिसून येत आहे.

त्यामुळे या रब्बी हंगामामध्ये तुम्हाला देखील ज्वारी लागवड करायची असेल व तुमच्याकडे भारी आणि बागायती जमीन असेल तर तुमच्या करिता या लेखामध्ये काही महत्त्वाच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांची माहिती थोडक्यात दिली आहे.

भारी जमिनीसाठी ज्वारी पिकाचे सुधारित वाण

1- फुले वसुधा- ही जात भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती या दोन्हीसाठी शिफारस केलेली जात असून पेरणीनंतर साधारणपणे 116 ते 120 दिवसांमध्ये पक्व होते. या ज्वारीच्या व्हरायटीचे दाणे मोत्यासारखे पांढरे शुभ्र व चमकदार असतात. भाकरीची चव देखील उत्तम असते व मिळणारा चारा देखील उत्तम प्रतीचा मिळतो.

फुले वसुधा ही व्हरायटी ज्वारीवर येणाऱ्या खडखड्या नावाच्या रोगाला प्रतिकारक्षम आहेच परंतु त्यासोबत खोडमाशीला देखील चांगली प्रतिकारक्षम समजली जाते.

या व्हरायटी पासून मिळणारे उत्पादन बघितले तर कोरडवाहू मध्ये 25 ते 28 क्विंटल आणि बागायतीमध्ये तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टर इतके मिळते व कडब्याचे उत्पादन 55 ते 60 क्विंटल कोरडवाहू क्षेत्रात आणि 60 ते 65 क्विंटल बागायती क्षेत्रामध्ये मिळते.

2- फुले पूर्वा- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सन 2022 मध्ये ज्वारीचा हा वाण प्रसारित केलेला आहे. पेरणीनंतर साधारणपणे 118 ते 121 दिवसात काढणीस तयार होणाऱ्या या व्हरायटी पासून कोरडवाहू क्षेत्रात प्रतिहेक्टर 25 ते 30 क्विंटल व कडब्याचे 60 ते 65 क्विंटल उत्पादन मिळू शकते. विशेष म्हणजे ज्वारीचा हा वाण जमिनीवर लोळत नाही तसेच खडखड्या व खोडमाशी इत्यादींना प्रतिकारक्षम आहे.

बागायती क्षेत्राकरिता महत्त्वाचा असलेला वाण

1- फुले रेवती- ज्वारी पिकाचा हा वाण खास करून भारी आणि बागायती जमिनीसाठी विकसित करण्यात आलेला आहे. या वाणाच्या ज्वारीच्या भाकरीची चव अतिशय उत्तम असते व चाऱ्याचे देखील अधिक उत्पादन मिळते व यापासून मिळणारा चारा पौष्टिक आणि पाचक आहे.

फुले रेवती या व्हरायटी पासून साधारणपणे हेक्टरी 40 ते 45 क्विंटल धान्याचे तर चाऱ्याचे 90 ते 100 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. पेरणीनंतर साधारणपणे 118 ते 120 दिवसात काढणीस तयार होतो. ज्वारीचा हा वाण खोडमाशी व खडखड्या या रोगांना प्रतिकारक्षम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe