Farmer Success Story : मन मे हो विश्वास तो हम होंगे कामयाब ! मनात विश्वास असला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी धडपड करण्याची धमक असेल तर निश्चितच ‘कामयाब’ होताच येते. अशाच विश्वासाची आणि जिद्दीची कहाणी समोर येत आहे ती सहकार क्षेत्रातील अग्रगण्य जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातुन.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्यात एकेकाळी शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून ओळख मिळवलेल्या हरिभाऊ किसन खंबरे यांनी सेवानिवृत्तीनंतर शेती व्यवसायात पदार्पण केले. विशेष म्हणजे शेती व्यवसायात आल्यानंतर त्यांनी शेती मध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून प्रयोगशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ख्याती मिळवली आहे.
शेवगाव तालुक्यातील मौजे शहरटाकळी येथील आपल्या शेतजमीनीत हरिभाऊ यांनी सेंद्रिय पद्धतीने सिताफळ बाग फुलवून मन मे हो विश्वास तो हम होंगे कामयाब हे विधान सत्यात उतरवून दाखविले आहे. त्यामुळे सध्या हरिभाऊंची पंचक्रोशीत नव्हे नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
हरिभाऊ किसन खंबरे यांनी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्यात कर्मचारी म्हणून 43 वर्षे काम केले. हरिभाऊ यांच्या मते त्यांनी आपल्या 43 वर्षांच्या सेवेत एकही दिवस रजा घेतलेली नाही. अर्थातच शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून त्यांनी कारखान्यात ओळख मिळवली. विशेष म्हणजे सेवानिवृत्तीनंतर दुसऱ्यांवर विसंबून न राहता हरीभाऊ यांनी शेतीमध्ये स्वतःला वाहून घेतले आहे.
हरिभाऊ यांच्याकडे एकूण सहा एकर शेत जमीन आहे. या शेतात जमिनीपैकी अडीच एकर शेत जमिनीत त्यांनी सीताफळ बाग फुलवली आहे. 2019 मध्ये त्यांनी अडीच एकर क्षेत्रात सिताफळाचे लागवड केली आहे. हरिभाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी, तीन फूट लांब रुंद आणि खोल खड्डे खोदले.
त्यात गरजेनुसार सेंद्रिय खत टाकली. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत गांडूळ खत यांसारखी जैविक खते वापरण्यात आली. यानंतर खड्ड्यात रोपांची लागवड करण्यात आली. शंभर रुपयाला एक याप्रमाणे एकूण 900 रुपये विकत आणून अडीच एकर क्षेत्रात लागवड करण्यात आली.
हरिभाऊ यांच्या मते सीताफळ लागवड केल्यानंतर त्यांनी सीताफळ बागेत आंतरपीक घेण्यात देखील सुरुवात केली. तर पीक म्हणून कपाशी तूर कांदा ही पिके घेण्यात आली. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात सिताफळ भाग जोपासण्यासाठी येणारा खर्च आंतरपिकातून वजा होत गेला. शिवाय हाती दोन पैसे शिल्लक राहिले.
आता यावर्षी सिताफळ देखील उत्पादन देण्यास सज्ज झाल असून सिताफळ पासून त्यांना बंपर उत्पादन मिळत आहे. एका सिताफळाचे वजन 700 g ते 1200 g दरम्यान भरत आहे. हरिभाऊ यांच्या मते लागवड केल्यापासून ते आत्तापर्यंत सीताफळ बागेसाठी त्यांना जवळपास चार लाखांचा खर्च आला आहे. अडीच एकर सीताफळ बागेतून त्यांना जवळपास चार टन उत्पादन मिळण्याची आशा आहे.
सिताफळला दीडशे ते दोनशे रुपयांचा दर मिळावा असे त्यांना वाटतं आहे. निश्चितच एवढा दर मिळाला तर हरिभाऊ यांना सहा लाख ते आठ लाखांपर्यंतची कमाई होण्याची शक्यता आहे. हरिभाऊ यांनी उत्पादित केलेले सिताफळ चवीला गोड आणि सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादित केलेली असल्याने पोषण मूल्यांनी समृद्ध आहेत.
शिवाय हरिभाऊ यांच्या मते लोकांना त्यांची सीताफळे आवडत आहेत. निश्चितच 43 वर्षे अविरतपणे साखर कारखान्यात सेवा बजावल्यानंतर हरिभाऊ शेती व्यवसाय देखील अखंडपणे कर्म पूजा करत आहेत आणि यामुळे याचे ‘फळ’ देखील त्यांना ‘सिताफळा’च्या रूपात गोड भेटणार आहे.