Drone Subsidy Scheme:- कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून अनेक अशा आर्थिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. अशा योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते व या माध्यमातून शेतीत आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मदत होत असते.
अशाच प्रकारचे जर आपण कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे असलेली एक योजना जर पाहिली तर ती म्हणजे ड्रोन अनुदान योजना होय. ड्रोनचा वापर हा शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायद्याचा ठरणार आहे. पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी तर ड्रोन फायद्याचा ठरतोच.परंतु या माध्यमातून रोजगार निर्मितीला देखील चालना मिळू शकते.
त्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेच्या माध्यमातून ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आला असून ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात येत आहे. सन 2024-25 यासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत शंभर ड्रोन खरेदीसाठी महाराष्ट्र राज्याकरिता वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आह.
या अंतर्गत आता शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था व कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थी यांना या माध्यमातून अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
कुणाला मिळेल किती अनुदान?
या अंतर्गत शेतकरी सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांना जवळपास ड्रोन खरेदीच्या 40% म्हणजे चार लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. तसेच कृषी व कृषीशी संबंधित पदवीधर यांना 50 टक्के म्हणजेच पाच लाख रुपये अनुदान या माध्यमातून दिले जाईल.
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना 50 टक्के म्हणजेच पाच लाख रुपये तर सर्वसाधारण शेतकऱ्यांना 40% म्हणजे चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे.या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन प्रक्रिया राबवण्याबाबतची सूचना देखील कृषी आयुक्तांनी दिली आहे.
शेतीसाठी कसा होईल ड्रोनचा फायदा?
पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झालास किंवा रोगांचा प्रादुर्भाव होऊच नये याकरिता शेतकरी पिकांवर फवारणी करत असतात.पिकांवर फवारणी करण्याकरिता कालावधी तर जास्त लागतोच.परंतु खर्च देखील जास्त लागतो व कधीकधी विषबाधेची समस्या देखील उद्भवते.
परंतु आता ड्रोनच्या वापरामुळे पिकांवर फवारणी करणे सोपे झाले आहे.शेतकरी ड्रोनची माहिती घेऊन स्वतः फवारणी करू शकतात किंवा तज्ञ प्रशिक्षण चालकांकडून फवारणी करून घेऊ शकतात.शिवाय इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फवारणीचे काम करून या माध्यमातून रोजगार निर्मिती देखील होते.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व अर्ज करायचा असेल तर महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.