Nano DAP News : शेतकरी बांधवांना पिकाच्या जोमदार वाढीसाठी वेगवेगळ्या खतांची मात्रा द्यावी लागते. यामध्ये युरिया आणि डीएपी याचा वापर सर्वाधिक होतो. मात्र अनेकदा युरिया आणि डीएपीची बाजारात मोठी कमतरता जाणवते. मागणीच्या तुलनेत या दोन खतांचा पुरवठा बाजारात कायमच कमी पाहायला मिळतो.
यामुळे अनेकदा विक्रेत्यांकडून या खतांची अधिक किमतीत विक्री होत असते परिणामी शेतकऱ्यांच्या खतांवरील खर्चात वाढ होते. याच पार्श्वभूमीवर इफकोने नॅनो युरिया बाजारात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
हा नॅनो युरिया शेतकरी बांधवांना कमी किमतीत उपलब्ध होतो शिवाय याचा वापर केल्यास खताचा अपव्यय टाळता येतो. एवढेच नाही तर द्रवरूपात उपलब्ध झालेला हा नॅनो युरिया वापरल्याने जमिनीचा पोत देखील खराब होत नाही.
सामान्य युरिया हा सॉलिड मध्ये उपलब्ध असल्याने याचा शेत जमिनीवर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. म्हणजेच नॅनो युरिया वापरल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चात बचत होते शिवाय जमिनीचा पोत अबाधित राखला जातो आणि यामुळे उत्पादनात देखील वाढ होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अशातच आता बाजारात लवकरच नॅनो डीएपी येणार आहे. येत्या दोन दिवसात या नॅनो डीएपीला अधिकृत मान्यता मिळणार आहे. हे खत भारतीय कृषी संशोधन परिषदेने एका वर्षासाठी सर्वप्रथम जारी करण्याचे सुचवले आहे. दरम्यान तज्ञ लोकांनी नॅनो डीएपी बाजारात आल्यास फायदा होणार असल्याचे सांगितले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
याबाबत अधिक माहिती अशी की, जैव-सुरक्षा आणि विषाची चाचणी झाली त्यात नॅनो-डीएपी सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. अशा परीस्थितीत याला अंतिम मंजुरी लवकरच मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान इफ्को आणि कोरोमंडल इंटरनॅशनल या दोन्ही कंपन्यांनी नॅनो-डीएपीला मंजुरी मागितली असून या दोन्ही कंपन्यांचे नॅनो डीएपी मंजूर केले जाणार आहेत, कारण ICAR ने एक वर्षासाठी मान्यता दिली जाऊ शकते असे म्हटले आहे.
मात्र असे असले तरी, सरकार शेतकऱ्यांना नॅनो-डीएपीचा वापर शेतात व्यावसायिकपणे करू देणार की फक्त बियाण्यांसाठी वापरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र नॅनो डीएपी लवकरात लवकर बाजारात येत असल्याने जर याचा शेतकऱ्यांना फायदा झाला तर निश्चितच व्यावसायिकपणे शेतकऱ्यांना याच्या वापरासाठी सूट दिली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान इफकोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील खरीप हंगामापासून नॅनो डीएपी उपलब्ध होणार असून 500 मिली बाटल्याची किंमत सहाशे रुपये एवढी राहणार आहे. विशेष म्हणजे सध्या डीएपीची 50 किलोची बॅग जी की 1350 रुपयाला उपलब्ध आहे जेवढी कार्यक्षम राहणार आहे तेवढीच ही बाटली कार्यक्षम राहील.
म्हणजेच शेतकऱ्यांचा निम्मा खर्च वाचेल आणि यामुळे कुठे ना कुठे पिकाचे दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.