Organic Fertilizer: घरच्या घरी अशा पद्धतीने तयार करा सुपर फॉस्पो कंपोस्ट खत! शेणखतापेक्षा आहे मुख्य अन्नद्रव्यांची मात्रा जास्त

Ajay Patil
Published:

Organic Fertilizer:- शेतीमध्ये पिकांपासून भरघोस उत्पादन मिळावे म्हणून खत व्यवस्थापनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकरी पिकांना विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.

कारण पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची आवश्यकता असते व त्यासोबतच बऱ्याच प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील तितकीच आवश्यकता भासते. याकरिता बरेच शेतकरी रासायनिक खतांसोबत अनेक प्रकारचे मायक्रो न्यूट्रिएंट्स खतांचा वापर करतात आणि सेंद्रिय खताच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शेणखत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

शेणखतापासून मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांना मोठ्या प्रमाणावर होतो. परंतु जर शेणखताचे दर पाहिले तर साधारणपणे पाच हजार रुपयात एक ट्रॉली अशा पद्धतीने असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला शेणखत पिकांसाठी घेणे आर्थिक दृष्टिकोनातून परवडत नाही.

त्यामुळे या अनुषंगाने या लेखात आपण सुपर फोस्पो कंपोस्ट खत घरच्या घरी कसे तयार करू शकतो त्याबद्दलचे महत्त्वाची माहिती घेणार आहोत. जर आपण या खताचा विचार केला तर शेणखताच्या तुलनेमध्ये या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची मात्रा जास्त असते.

 याकरिता कुठले साहित्य लागेल?

सुपर फॉस्फो कंपोस्ट खत घरच्या घरी तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतातील पिकांचे अवशेष जसे की उसाचे पाचट किंवा बाजरीचा चाऱ्याचा भुगा किंवा गव्हाचे काड, तूर, सोयाबीन तसेच हरभरा इत्यादी पिकांचे अवशेष, शेण आणि हे सगळे मिश्रण कूजवण्यासाठी लागणारे आवश्यक कल्चर इत्यादी साहित्य तुम्हाला लागेल.

 अशा पद्धतीने तयार करा हे खत

1- याकरिता नऊ ते दहा फूट लांब आणि पाच ते सहा फूट रुंद आणि दोन फूट खोल अशा आकारमानाचा एक खड्डा अगोदर करावा.

2- या खड्ड्यामध्ये पॉलिथिन किंवा एखादे जुने बॅनर असेल तर ते या खड्ड्याच्या जमिनीच्या वर एक फुटापर्यंत अंथरून घ्यावे.

3- यामध्ये चार ते पाच क्विंटल गव्हाची काड, बाजरी तसेच भात, उसाची पाचट, तूर, सोयाबीन यांचे मिश्रण अथवा फक्त एकाच प्रकारचे सेंद्रिय पदार्थ यामध्ये टाकावे. या मिश्रणावर साधारणपणे शंभर ते 150 किलो शेण टाकावे.

4- हे सगळे मिश्रण लवकरात लवकर कुजावे याकरिता सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या बुरशीचे मिश्रण ज्यामध्ये ट्रायकोडर्मा पॅसिलोमाईस फ्युझीस्पोरस व अस्परजिलस अवमोरी इत्यादी एक किलो कल्चर वरील मिश्रणामध्ये टाकावे. हे घटक असलेले कल्चर तुम्हाला कृषी विद्यापीठांमध्ये मिळू शकते.

5- या माध्यमातून चांगल्या प्रतीचे स्फुरदयुक्त सेंद्रिय खत तयार करण्यासाठी 100 ते 120 किलो रॉक फॉस्फेट( 12 ते 20 टक्के पर्यंत) व पाचशे मिली द्रवरूप किंवा एक किलो घनरूप स्फुरद विरघळणारे जिवाणूंचे मिश्रण या सर्व सेंद्रिय पदार्थ व शेणावर टाकून पुन्हा मिसळून घ्यावे.

6- या मिश्रणाला दर पंधरा दिवसांनी वर खाली करून एकत्र मिसळून घ्यावे. असं केल्यामुळे याची कुजण्याची प्रक्रिया एकसमान रीतीने व वेगाने होते.

7- अशाप्रकारे कृती केल्याने 90 दिवसानंतर तुम्हाला उत्तम प्रतीचे फोस्पो कंपोस्ट खत तयार मिळते.

अशा साध्या प्रकारे तुम्ही स्फुरदयुक्त सेंद्रिय खत म्हणजेच फास्पो कंपोस्ट खत घरच्या घरी तयार करू शकतात व जमिनीमध्ये स्फुरदचे प्रमाण वाढवून पिकांचे भरघोस उत्पादन घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe