Pearl Farming:- महाराष्ट्रामध्ये शेतीचे स्वरूप पाहिले तर आता ते फार वेगाने बदलत असून खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारची फळपिके तसेच भाजीपाला पिकांची लागवड शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर करत असून त्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा देखील मिळवत आहेत.
शेती पिकासोबतच शेतीला आवश्यक असणारे जोडधंद्यांच्या माध्यमातून देखील शेतकरी चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवत आहेतच.परंतु मत्स्य व्यवसाय तसेच कुक्कुटपालन व त्यांच्यासोबत मोत्यांच्या शेतीसारखा प्रयोग देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला आहे.
यामध्ये जर आपण दिलीप कांबळे या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा विचार केला तर त्यांनी नोकरी सोबतच मोत्यांची शेती करायला सुरुवात केलेली व खूप मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करत त्यामध्ये त्यांनी आता जम बसवला आहे. त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
मोत्यांच्या शेतीतून आर्थिक प्रगती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हापुरातील दिलीप कांबळे त्यांनी नोकरी सोबतच मोत्याच्या शेतीतून वार्षिक चार ते पाच लाख रुपये मिळण्याचा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला असून सुरुवातीला अनेक प्रकारच्या अपयशाच्या सामना करावा लागला. परंतु न डगमगता त्यांनी जिद्दीने मोत्याची शेती यशस्वी करून दाखवली.
ते निर्यातयोग्य दर्जाचे मोती तयार करत असून भारतातील किमतीपेक्षा तिप्पट किमतीत ते विदेशात या मोत्यांची विक्री करत आहेत. विदेशात चांगला दर मिळत असल्यामुळे ते केवळ निर्यातीवरच भर देताना दिसून येत आहेत.
दिलीप कांबळे हे एका वर्षामध्ये तब्बल वीस हजार निर्यातयोग्य दर्जाच्या मोतीचे उत्पादन याची त्यांच्या टार्गेट असून त्या पद्धतीने ते आता काम देखील करत आहेत. वेगवेगळ्या आकाराचे मोती तयार करण्यामध्ये त्यांचा हातखंडा असून वेगवेगळ्या आकाराच्या मोतीना चांगला दर देखील मिळतो.
अशा पद्धतीने केली मोत्यांची शेतीला सुरुवात
दिलीप कांबळे सांगतात की, जर सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये मोत्यांची शेती करत असाल तर फारसा खर्च येत नाही. अगदी कमीत कमी पैशांमध्ये देखील तुम्ही चांगला नफा या माध्यमातून मिळवू शकतात. पण मोत्यांची शेती सुरू करण्यापूर्वी तुम्ही योग्य प्रशिक्षण घेणे खूप गरजेचे आहे.
प्रशिक्षण घेऊन जर तुम्ही मोत्यांची शेती सुरू केली तर तुमचा हा प्रकल्प अयशस्वी होणार नाही. शेतकरी प्रामुख्याने शिंपले यांच्या मदतीने तलाव किंवा टाक्यांमध्ये मोती तयार करतात. कांबळे यांनी जेव्हा मोत्यांची शेती करण्याचे निश्चित केले तेव्हा 2015 मध्ये त्यांनी इंटरनेटवरून याबद्दलचे सर्व महत्त्वाची माहिती गोळा केली
व त्यासोबतच 2016 मध्ये नागपूर येथे याचे प्रशिक्षण घेतले. परंतु चांगले प्रशिक्षण न मिळाल्याने सलग तीन वर्षे ते यामध्ये अपयशी ठरले. परंतु जिद्दीने काम न सोडता त्यांनी ते पुढे सुरू ठेवले व यशस्वी झाले. दिलीप कांबळे म्हणतात की मोत्यांच्या शेतीमध्ये क्षमता चांगली असल्याने त्यांनी काम थांबवले नाही व तोटा येत असताना देखील काम सुरू ठेवले
व त्यानंतर प्रशिक्षणाकरिता सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर ओडिसा या ठिकाणी प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला व चांगले प्रशिक्षण घेतल्यानंतर 2019 मध्ये नव्याने कामाला सुरुवात केली व सुरुवातीला 5000 शेल आणि नंतर साडेआठ हजार शेलचा सेटअप तयार केला. अशा पद्धतीने यश मिळवल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
एक मोती देऊ शकतो तुम्हाला दोन हजार रुपयांचे उत्पन्न
2021 मध्ये कांबळे यांना निर्यातयोग्य दर्जाचा मोती मिळाला. त्याची किंमत 300 ते 500 रुपये प्रति नग होते. म्हणजेच एका मोत्यासाठी शंभर रुपये गुंतवून त्यांना तीनशे ते पाचशे रुपये मिळत होते. यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली व त्यांनी शेतामध्ये स्वतःचा तलाव तयार करून मोत्याच्या शेतीला सुरुवात केली.
त्यांच्या मते निर्यातीकरिता मोत्यांना खूप मोठी मागणी आहे व निर्यातयोग्य मोत्याला तीनशे ते दोन हजार रुपये दर मिळण्याची देखील शक्यता असते. परंतु त्याकरिता मोती हा जागतिक दर्जाचा असावा. दिलीप कांबळे हे मोत्याच्या शेतीमध्ये यशस्वी झाले
असून त्यासोबत ते 2019 पासून 125 शेतकऱ्यांना त्यांनी मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण देखील दिले असून सध्या त्यांचे देशात 15 मोती शेती प्रकल्प सुरू आहेत. निर्यात केल्या जाणाऱ्या मोत्यांना चांगला दर मिळत असल्यामुळे त्यांनी संपूर्ण फोकस आता त्यावर केंद्रित केलेला आहे.
अशा पद्धतीने दिलीप कांबळे यांनी अनेकदा अपयश येऊन देखील सातत्य व जिद्दीने मोत्याची शेती सुरू केली व आज वार्षिक यातून पाच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मिळवण्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत.