Shewga Lagwad Anudan : आपल्या देशात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतीशी संबंधित असलेले व्यवसाय केले जातात. शेतीशी संबंधित व्यवसायात पशुपालन हा व्यवसाय सर्वात जास्त केला जातो. या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते, त्यांचे जीवनमान सुधारते आणि त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत असते.
शिवाय या व्यवसायातून शेतकरी बांधवांना सेंद्रिय खताची म्हणजेच शेणखताची उपलब्धता होत असते. म्हणजेच या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळते आणि शेणखताचा वापर पिकासाठी केला जातो. शेणखत विक्रीतून देखील शेतकऱ्यांना कमाईचे अतिरिक्त साधन उपलब्ध होते.
यामुळे साहजिकच पशुपालन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी आपल्या राज्यात वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अशीच एक योजना सोलापूर जिल्ह्यात सुरु झाली आहे. सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागांतर्गत राष्ट्रीय पशुधन अभियानच्या माध्यमातून जनावरांना वैरण उपलब्ध व्हावे या अनुषंगाने शेवगा लागवडीसाठी अनुदानाची तरतूद करून देण्यात येत आहे.
या योजनेच्या माध्यमातून वैरणीसाठी शेवगा लागवड करणे हेतू अनुदान मिळत असल्याने पशुपालक शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान इच्छुक शेतकऱ्यांना 8 जानेवारी पर्यंत अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही योजना सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी सुरू असून शेवगा लागवड ही केवळ वैरणीसाठी केली जाऊ शकते. तसेच या योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणं हे प्रशासनाकडून प्रोव्हाइड केलं जाणार असून त्यासाठी आवश्यक पूर्व मशागतीसाठी तसेच खताच्या उपलब्धतेसाठी उर्वरित अनुदान देण्याचे नियोजन आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनुसुचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून केवळ वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा १० गुंठे / आर क्षेत्र किंवा १० आरच्या पटीत, प्रति १० गुंठे ७५० ग्रॅम शेवगा (पीकेएम-१) बियाणाची किंमत रु.६७५/- व उर्वरित अनुदान रु. २३२५/- असे एकूण अनुदान रु.३००० दिले जाणार आहेत.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा कमीत कमी व अधिकतम एक हेक्टर एवढी आहे. म्हणजे प्रति हेक्टर ७.५ किलो शेवगा (पीकेएम-१) बियाण्याची किंमत रु.६७५०/- व उर्वरित अनुदान रु.२३,२५०/- हे दोन टप्प्यांमध्ये वितरित केले जाणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे बियाण्याचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार आहे.
आणि जे काही उर्वरित अनुदान राहील त्यातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर आवश्यक असा खर्च संबंधित पात्र पशुपालक शेतकरी बांधवांना करता येणार आहे. यासाठी इच्छुक पशुपालक शेतकरी बांधवांना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती आणि नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निश्चितच प्रशासनाच्या या योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.