शेळीपालन असा व्यवसाय आहे तो कमीत कमी जागेमध्ये सुरू करता येतो आणि खर्च देखील इतर व्यवसायांच्या तुलनेत खूप कमी लागतो. या व्यवसायात देखील आता अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण आता या व्यवसायाकडे वळत असून व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
तुम्हाला देखील शेळीपालन व्यवसाय करायचा असेल आणि तो तुम्हाला यशस्वी देखील करायचा असेल तर याकरिता तुम्हाला शेळी पालन व्यवसायामध्ये ज्याप्रकारे व्यवस्थापन करावे लागते ते खूप महत्त्वाचे असते. शेळीपालनासाठी शेळ्यांच्या जातींची निवड यावर देखील तुमच्या व्यवसायाचे यशाचे गणित ठरलेले असते. दर्जेदार आणि जातिवंत अशा जातींची निवड शेळीपालनासाठी करणे खूप गरजेचे असते.
याच अनुषंगाने जर आपण शिरोही या शेळीच्या जातिचा विचार केला तर ही मांस व दूध उत्पादनासाठी खूप महत्त्वाची अशी जात आहे. या जातीचे बोकड त्यांच्या देखणेपणामुळे आणि त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे ईद साठी खूप मागणी असते. याचा अनुषंगाने आपण या लेखात शिरोही या जातीच्या शेळी पालन विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.
सिरोही जातीच्या शेळीचे शारीरिक वैशिष्ट्ये
1- आपण या जातीच्या बोकडाचे वजन पाहिले तर ते 60 ते 65 किलो असते व मादीचे वजन 45 ते 50 किलो पर्यंत भरते.
2- जातीची शेळी रंगाने पूर्ण तपकिरी व अंगावर विविध प्रकारच्या रंगछटा दिसून येतात.
3- या जातीच्या शेळीमध्ये काही शेळ्यांना शिंगे असतात तर काहींना नसतात. ज्या शेळ्यांना शिंगे असतात ती मध्यम आकाराची व मागे वाक असलेले असतात.
4- शिरोही जातीच्या शेळीचे डोळे हे काळे व तपकिरी रंगाचे असतात.
सिरोही जातीची शेळी खरेदी करताना ही काळजी घ्या
1- जातीची शेळी घेताना वर उल्लेख केलेले सर्व गुणवैशिष्ट्ये पाहून ती विकत घ्यावी.
2- तसेच महाराष्ट्रातील वातावरणामध्ये व्यवस्थित सेट झालेल्या शेळ्या विकत घेण्याला प्राधान्य द्यावे.
3- शारीरिक व्यंग असलेली किंवा आजारी असलेली शेळी घेऊ नये.
4- या जातीची शेळी विकत घेताना ती जास्त दूध देणारी घ्यावी कारण शेळीच्या करडांना मुबलक प्रमाणात दूध मिळून त्यांना योग्य पोषण मिळेल.
5- तसेच जास्त वयाच्या शेळ्या खरेदी करू नयेत.
शिरोही जातीच्या शेळीचे व्यवस्थापन
1- या जातीच्या शेळीचे व्यवस्थापन करताना तिला दिवसातून पाच ते सहा किलो चारा देणे गरजेचे आहे. यामध्ये 70 टक्के हिरवा चारा तर 30 टक्के सुखाचारा द्यावा.
2- हिरव्या चाऱ्यामध्ये जास्त प्रोटीन असलेला पौष्टिक चारा शेळीला दिला तर तिचे चांगली वाढ होते व त्यापासून साहजिकच आपल्याला आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळते. या शेळी साठी हिरवा चारा देताना मेथी घास, दशरथ घास, हादगा गवत, शेवरी तसेच हत्ती गवत इतर झाडपाला द्यावा.
3- तसेच या शेळ्यांना 24 तास स्वच्छ असे पाणी मुबलक प्रमाणे द्यावे.
4- तुम्ही जर बंदिस्त शेळीपालन करत असाल तर प्रत्येक शेळीला दररोज 15 ते 20 ग्रॅम मिनरल मिक्स्चर द्यावे. त्यामुळे शेळीमध्ये प्रजनन संबंधित काही दोष तुम्हाला दिसून येणार नाही तो तिच्या आरोग्य देखील चांगले राहील.
5- तसेच लसीकरण हे वेळेवर करून घ्यावे व शेळ्यांचे डी वॉर्मिंग प्रत्येक सहा महिन्यातून एकदा करावे.
6- सिरोही जातीच्या शेळ्यांना त्यांच्या वयानुसार व त्यांची शारीरिक क्षमता पाहून शेडमध्ये वेगवेगळे कप्पे तयार करावे. लहानपिल्लांसाठी वेगळा कप्पा, गाभण शेळ्यांसाठी वेगळा कप्पा तसेच नर शेळ्यांचा वेगळा अशा पद्धतीने कप्प्यांची रचना करावी.
ईद साठी शिरोही बोकडांचे पालन
1- शिरोही जातींच्या बोकडांचे जे काही शारीरिक रचना असते व त्यांच्या रंगांमधील विविधता असल्यामुळे ईदच्या कालावधीत त्यांना खूप मोठी मागणी असते.
2- ईदच्या कालावधीत या जातीच्या बोकडांना चांगली मागणी यावी यासाठी ते दिसायला चांगले व रुबाबदार असणे गरजेचे आहे. त्या
प्रमाणे त्यांची काळजी घ्यावी.
3- यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारची व्यंग किंवा जखम असू नये व त्यांची शिंगे तुटलेली नसावी. ईदकरिता आपण शिरोही जातीच्या खच्ची केलेल्या बोकडांचे पालन करू शकतो. त्यांच्यासाठी योग्य आहार व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी.
शिरोही जात कशी आहे फायद्याची?
ही शेळी दीड वर्षातून दोन वेळा वेत देते. शिरोही जातीच्या शेळ्यांमध्ये एक पिल्लू देण्याचे प्रमाण 40%, पिल्लू देण्याचे प्रमाण 50% आणि तीन पिल्लू देण्याचे प्रमाण 10% आहे. शेळीचे दूध देण्याचे प्रमाण पाहिले तर ते आहाराचे योग्य व्यवस्थापन असले तर दिवसाला एक ते दोन लिटर दूध देऊ शकते.
या शेळीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कोणत्याही प्रकारच्या वातावरणामध्ये तग धरते व वातावरणाशी जुळवून घेते. तापमानाचा विचार केला तर 40 पेक्षा जास्त उष्ण तापमान देखील ही तग धरते व चार ते पाच डिग्रीपर्यंतची थंडी सहन करू शकते.
शिरोही जातीच्या शेळीच्या अधिक माहिती करिता हा व्हिडिओ पहा