Success Story : राज्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून हवामान बदलामुळे संकटात सापडले आहेत. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी अवकाळी या साऱ्या संकटात शेतकऱ्यांना अतिशय तोकडं उत्पादन मिळत आहे.
यावर्षी खरीप हंगामात देखील निसर्गाच्या या दृष्टचक्रामुळे अनेकांना नगण्य असं उत्पादन मिळालं आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने या विपरीत परिस्थितीमध्ये देखील सोयाबीन शेतीतून दर्जेदार उत्पादन घेऊन दाखवल आहे. खरं पाहता, सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन मराठवाड्यात घेतले जाते.
पण आता पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी देखील या नगदी पिकाच्या शेतीकडे वळत आहेत. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी मधील शांताराम सर्जेराव पाचंगे यांनी देखील सोयाबीन लागवडीचा प्रयोग पुणे जिल्ह्यात यशस्वी करून दाखवला आहे.
विशेष म्हणजे मराठवाड्याचं मुख्य पीक सोयाबीनचे योग्य व्यवस्थापन करून एकरी तेरा क्विंटलचा उतारा प्राप्त केला आहे. त्यामुळे सध्या त्यांची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. शांताराम यांच्याकडे एकूण पाच एकर शेत जमीन आहे. यातील एक एकर शेत जमिनीत त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती.
एक महिना झाला त्यांनी सोयाबीन काढणी केले असून तेरा क्विंटल एवढे उत्पादन मिळाले आहे. ढोकसांगवी परिसरातील एकूण पाच ते सहा शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतीचा प्रयोग केला आहे. शांतारामराव यांच्या मते सोयाबीनला चांगला दर मिळाला तर पुढील वर्षी या पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.
दरम्यान आता सोयाबीन पिकाची काढणी झालेल्या क्षेत्रात ते गव्हाची पेरणी करणार आहेत. खरं पाहता इंदापूर बारामती दौंड शिरूर या भागात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असे. मात्र आता या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट होत आहे. मात्र शांतारामराव अजूनही ज्वारीचे पीक घेतात.
त्यांनी आपल्या दोन एकर शेतजमिनीत ज्वारीची पेरणी केली आहे. यातून त्यांना 25 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार आहे. लकडी जातीची ज्वारी बियाणे त्यांनी पेरले होते. ज्वारी, गहू, बाजरी आणि आता सोयाबीन अशा वेगवेगळ्या पिकांचीं ते शेती करत आहेत. तसेच आपल्या दहा गुंठे शेत जमिनीत फक्त आणि फक्त शेणखताच्या माध्यमातून हिरवी मिरची कारली, टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची, काकडी, कोथिंबीर, मेथी, वाल यांसारखी भाजीपाला पिके घेतात.
विशेष म्हणजे ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करत असून रासायनिक खतांचा अजिबात वापर करत नाही. खरं पाहता, शांतारामराव यांनी एमआयडीसी परिसरात खोल्या बांधल्या आहेत ज्या की भाडेतत्त्वावर दिल्या जातात. याशिवाय जमीन खरेदी विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे.
शेतीमध्ये त्यांच्या पत्नीची त्यांना नेहमीच साथ लाभली आहे. एक दीड एकरात जनावरांसाठी हिरवा चारा पीक देखील ते घेतात. त्यांच्याकडे दोन म्हशी आणि तीन गाई आहेत. म्हणजे इतर व्यवसाय करून शेती आणि पशुपालन ते करत आहेत. निश्चितच आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळत त्यांनी शेतीमध्ये साधलेली ही प्रगती इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.