Sugarcane Crop Management:- महाराष्ट्रातील ऊस हे प्रमुख पीक असून राज्यांमध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. साधारणपणे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊस लागवडीखालील क्षेत्र आहे. साधारणपणे जर आपण एक एकर ऊसाच्या लागवडीतून येणाऱ्या उसाचे उत्पादन पाहिले तर साधारणपणे ते 20 ते 35 टनांच्या दरम्यान जास्तीत जास्त मिळते.
एक वर्षभर शेतात उभे राहणारे पीक असून त्या पद्धतीने त्याचे नियोजन करणे देखील तितकेच गरजेचे असते. परंतु आता महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी शंभर टनांच्या आसपास एका एकर मध्ये उसाचे उत्पादन मिळवू लागलेले आहेत. यामध्ये आता उसाच्या नियोजनाच्या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण पद्धती आले असून अनेक नवनवीन प्रयोग देखील शेतकरी राबवताना दिसतात.
याच प्रयोगाचा भाग म्हणून जर आपण सांगली जिल्ह्यातील कृषी भूषण संजय माने यांचा विचार केला तर त्यांनी उसाचा एकरी 100 टन यशस्वी प्रयोग केला असून त्यानुसार ते आता इतर शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करत आहेत.
त्यांचा ऊस संजीवनी चार्ट असून तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती असणे खूप गरजेचे आहे. या ऊस संजीवनी चार्ट नुसार जर ऊस पिकाचे पूर्ण वर्षभर नियोजन केले तर तुम्ही देखील एकरी 100 टना पर्यंत उसाचे यशस्वी उत्पादन घेऊ शकतात हे मात्र निश्चित. त्याबद्दलचेच महत्त्वाची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
आडसाली ऊस संजीवनी चार्टनुसार ऊस लागवडी पूर्वी करायची कामे
1- अगोदर जमिनीमध्ये उसाची पाचटीची कुट्टी करून गाडून घ्यावी.
2- रोटर मारून नंतर नांगरट करावी व शक्य असेल तर उभी आडवी नांगरट करावी.
3- शेतामध्ये सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करणे गरजेचे असून यामध्ये 20 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत 15 टन वापरावे. त्याशिवाय हिरवळीचे खत,गांडूळ खताचा वापर करावा.
4- ढेकळे असतील तर ते फोडून बारीक करून घेऊन सरी काढावी.
5- सरी काढल्यानंतर सरीमध्ये थोडेसे सेंद्रिय खत पसरून घ्यावे व शक्य असेल तर कारखान्याची काळी राख 800 ते 900 किलो पसरून घ्यावी.
6- सरीमध्ये सेंद्रिय खत टाकल्यानंतर त्यावर रासायनिक खते बेसल डोस टाकून हलक्याशा अवजाराने सरींच्या मातीमध्ये चांगली मिसळून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
ऊस लागवडीच्या वेळेस काय करावे?
1- बियाण्यावर बुरशीनाशक व कीटकनाशकाची प्रक्रिया करूनच लागवड करावी. याकरिता एक ग्रॅम बुरशीनाशक, कीटकनाशक एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यावे आणि बियाणे 10 ते 15 मिनिटे बुडवावे.
2- उसाची लागवड करण्याअगोदर सरीमध्ये पाणी सोडावे व जमीन ओलवून घ्यावी. कोरड्यात लागण केली तर लगेच पाणी द्यावे किंवा पाण्यामध्ये लागवड करावी.
3- लागवड केल्यानंतर सहा ते सात दिवसात हलकेसे पाणी देणे गरजेचे असते.
अशा पद्धतीने आळवणी करावी
उसाला आळवणी केल्यामुळे पांढऱ्या मुळाची वाढ भरपूर होते व उसाची वाढ वेगात होते. तसेच फुटवे एकसारखे येतात व ते देखील जोमदार व योग्य प्रमाणात आपल्याला मिळतात. उसाची प्राथमिक स्वरूपातील वाढ चांगली होते व खतांचे शोषण देखील चांगले होते. आळवणी करताना रोपांची लावणी केल्यानंतर दोन ते चार दिवसांनी किंवा कांडी लावणी केली असेल तर सहा ते आठ दिवसांनी जमिनीत ओल असेल तेव्हा…
12:61:00- एक किलो, ब्लॅक बॉक्स एक, बुरशीनाशक 400 ग्राम, किडनाशक 400 मिली ( 200 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.)
सरीची रुंदी किती ठेवावी?
जर जमीन मध्यम व हलकी असेल तर जमिनीमध्ये साडेचार फुटाची व मध्यम व खोल काळी जमीन असेल तर पाच फूट रुंदीची सरी काढणे गरजेचे असते. पावर टिलरचा वापर करून भरणी होते आणि सहा फूट सरी काढली तर चार चाकी लहान ट्रॅक्टरने भरणी करता येते.
या पॅटर्ननुसार बेण्यातील अंतर किती ठेवावे?
मध्यम व हलकी जमीन असेल तर जमिनीत एक डोळा दीड फुटावर व मध्यम खोल काळ्या जमिनीमध्ये एक डोळा सव्वा फुटावर सरीत आडवे लावणे गरजेचे असते.
तणनाशकाचा वापर कसा करावा?
लागवड केल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी जमिनी जेव्हा ओली असते तेव्हा मेट्रीब्युझिनची फवारणी एकरी 300 ते 400 ग्रॅम दीडशे लिटर पाण्यातून समान पद्धतीने फवारणी करावी.
बेसल डोस कसा द्यावा?
बेसल डोस देण्यासाठी डीएपी 100 किलो, पोटॅश 75 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य 15 किलो, गंधक 15 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, कीटकनाशक दहा किलो(फरटेरा)
जिवाणू खतांचा वापर लागवड केल्यापासून दहाव्या दिवशी
नत्र स्थिर करणारे एक लिटर, स्फूरद विरघळणारे जिवाणू एक लिटर, ट्रायकोडर्मा एक लिटर( 200 लिटर पाण्यात मिसळून जमिनीत ओल असताना आळवणी करावी किंवा पाट पाण्यातून सोडावे. ड्रीप असेल तर ड्रिपच्या माध्यमातून सोडावे.)
रासायनिक खतांच्या डोसचे नियोजन
डोस क्रमांक दोन लागवडीपासून वीस ते पंचवीस दिवसांनी
युरिया 45 किलो सरीमध्ये टाकावा आणि डोस क्रमांक तीन हा लागवडीपासून 40 ते 45 दिवसांनी द्यावा व यामध्ये ९० किलो युरिया सरीमध्ये टाकावा.
उस संजीवनी प्रमाणे फवारणी क्रमांक 1( लागवडीपासून 45 व्या दिवशी)
पहिली फवारणीमध्ये संजीवके आणि पोषणद्रव्ये सोबत बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांचा समावेश करणे गरजेचे आहे. कारण या कालावधीत खोडकिडीचा प्रादुर्भाव होत असतो व बुरशी देखील त्रास देत असतात. त्यानुसार हे फवारणी योग्य ठरते. ( याकरिता 60 लिटर पाणी पुरेसे ठरते.)
रासायनिक खतांचा चौथा डोस( लागवडीपासून 60 ते 65 दिवसांनी)
युरिया 45 किलो,24:24:00 100 किलो, पोटॅश 50 किलो, लिंबोळी पेंड दहा किलो( एक खते मिसळून पहारीने एकाच बगलेत चार ते सहा इंच खोलीचे छिद्र घ्यावे आणि दोन क्षेत्रात एक फुट अंतराने खते घालून बुजवून घ्यावेत.)
ऊस संजीवनी फवारणी क्रमांक तीन( लागवडीनंतर 85 व्या दिवशी)
तिसरी फवारणीसाठी 135 लिटर पाणी पुरेसे ठरते.
रासायनिक खतांचा डोस क्रमांक पाच( 90 ते 120 दिवसांनी)
यामध्ये युरिया 135 किलो,24:24:00 100 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 150 किलो ( यामध्ये तुम्ही 24:24:00 आणि सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी 100 किलो डीएपीचा वापर केला तरी चालते.), पोटॅश 100 किलो, लिंबोळी पेंड १०० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य 15 किलो, गंधक 15 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो सरीत टाकून भरणी पूर्ण करावी.
जिवाणू खते( भरणी केल्यापासून दहाव्या दिवशी)
नत्र स्थिर करणारे जिवाणू एक लिटर, स्फुरद विरघळणारे एक लिटर आणि ट्रायको एक लिटर
ऊस संजीवनी फवारणी क्रमांक चार( लागवडीपासून 105 व्या दिवशी)
चौथी फवारणीसाठी 150 लिटर पाणी पुरेसे ठरते. चौथी फवारणी ऊस पिकासाठी खूप महत्त्वाचे असते. कारण यानंतर ऊस उंच वाढतो व त्यामुळे फवारणी करणे शक्य होत नाही.
रासायनिक खतांचा डोस क्रमांक सहा( भरणी केल्यापासून 30 दिवसांनी)
अमोनियम सल्फेट 45 किलो,24:24:00 100 किलो, पोटॅश 25 किलो आणि लिंबोळी पेंड दहा किलो मिसळून सरित टाकावे.
ऊस संजीवनी फवारणी क्रमांक पाच( लागवडीनंतर 125 दिवसांनी)
शक्य झाले तर पाचवी फवारणी करावी व याकरिता 180 लिटर पाणी पुरते.
रासायनिक खतांचा डोस क्रमांक सात( भरणी केल्यापासून 60 दिवसांनी)
अमोनियम सल्फेट 50 किलो व पोटॅश 25 किलो
काही महत्त्वाचे रासायनिक खतांविषयी नियोजन
1- कॅल्शियम नायट्रेट सात किलो मोठ्या भरणी नंतर पंधरा दिवसांनी स्वतंत्रपणे द्यावे.
2- त्यानंतर पंधरा पंधरा दिवसांच्या अंतराने कॅल्शियम नायट्रेट 3-3 किलो तीन चार वेळा स्वतंत्र दिल्यास ऊसाची जाडी वाढण्यास मदत होते.
3- सूक्ष्म अन्नद्रव्य देण्यापूर्वी माती परीक्षण करून कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य कमी किंवा जास्त आहे त्यानुसार नियोजन करावे. खालील प्रमाणे जर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नियोजन केले तर ऊस उत्पादन वाढण्यास फार मदत होते. त्यामध्ये प्रामुख्याने..
फेरस सल्फेट दहा किलो, जिंक सल्फेट दहा किलो, कॉपर सल्फेट 0.5 किलो, मॅग्नेज सल्फेट पाच किलो, बोरॉन एक किलो असे मिश्रण तयार करून याची उपयुक्तता चांगली वाढते. यापैकी जर तुम्ही फेरस सल्फेट आणि जिंक सल्फेट दोन्ही वेगवेगळे थोड्याशा सेंद्रिय खतात एक दोन दिवस मिसळून ठेवले तर त्याचे चिलेशन होते व उपलब्धता वाढते.