कमीत कमी वेळेमध्ये आणि इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जर चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असेल तर ते भाजीपाला पिकांच्या माध्यमातून होय. यासाठी फक्त बाजारपेठेमध्ये दर जर चांगले मिळाले तर शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवणे खूप सहजरीत्या शक्य होते. अगदी हीच गोष्ट जर आपण यावर्षी पाहिली तर आले आणि टोमॅटो या दोन पिकांच्या बाबतीत दिसून आलेली आहे.
टोमॅटो ने तर प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचेच काम केले आहे. कित्येकदा टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर येते आणि अगदी अशीच वेळ यावर्षी देखील आलेली होती. परंतु नशिबावर विश्वास ठेवून आणि टोमॅटो पिकात सातत्य ठेवलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी टोमॅटोने आयुष्यात एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच टोमॅटो पिकाने अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचं नशीब उज्वल केले असून या शेतकऱ्याने शंभर दिवसांमध्ये दोन एकर शेतीमधून लाखो रुपयांची कमाई केली आहे.
प्रदीप बंड यांनी टोमॅटो पिकातून मिळवले लाखोंचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमरावती जिल्ह्यात असलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील शेतकरी प्रदीप बंड यांनी तंत्रज्ञानाचा वापर आणि आधुनिक पद्धत अवलंबून दोन एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो लागवड केली आणि कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे. आज त्यांचा तालुक्यामध्ये गौरव एक आदर्श शेतकरी म्हणून केला जात असून इतर शेतकऱ्यांना देखील त्यांचे मार्गदर्शन आता मोलाचे ठरत आहे.
प्रदीप बंड यांनी जेव्हा टोमॅटो लागवड केली तेव्हा त्यांनी लागवडीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये टोमॅटो पिकाची व्यवस्थित काळजी घेतली व शेतामध्ये टोमॅटो लागवड करताना झिकझ्याक पद्धतीने मल्चिंग पेपर पसरवून घेतला व त्यावर टोमॅटो रोपांची लागवड केली. यामध्ये पाच फूट बाय दोन फूट चे बेड तयार करून त्यावर दीड फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली. पाण्याचे योग्य व्यवस्थापन राहावे याकरिता सिंचन पद्धतीचा वापर केला या माध्यमातूनच पाण्याचे व खताचे योग्य नियोजन केले.
सध्या देखील त्यांच्या शेतामध्ये दर्जेदार असे टोमॅटोचे पीक उभे असून अजून देखील टोमॅटोला उत्तम दर मिळत असल्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा नफा मिळताना दिसून येत आहे. ते त्यांचा टोमॅटो परतवाडा तसेच अमरावती आणि चांदूरबाजार या ठिकाणाच्या बाजारपेठेमध्ये विक्री करत असून त्या ठिकाणी मागणी देखील जास्त आहे. त्यांना साधारणपणे 650 ते 1500 रुपये प्रति 20 किलोचे कॅरेट असा बाजार भाव मिळत असल्यामुळे चांगल्या पद्धतीने आर्थिक फायदा मिळत आहे.
जर आपण त्यांच्या दोन एकर टोमॅटो प्लॉटचा एकूण खर्च पाहिला तर तो साधारणपणे दोन लाख रुपये आला असून यामध्ये बी बियाणे ते मजुरी, फवारणी तसेच खते व टोमॅटोचे झाडांची बांधणी तसेच फळे सोडणे, तणनियंत्रण करता निंदनी यासारखा खर्च समाविष्ट आहे. अशा पद्धतीने बाजार भाव चांगला मिळाल्यामुळे त्यांना खूप चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळाले असून यामध्ये शेतकऱ्यांचे कष्ट तर आहेतच परंतु नशिबाचा भाग देखील म्हणता येईल.