शेणखताचा पिकांना फायदा होण्यासाठी ‘अशा पद्धती’ने करावा वापर! नाहीतर फायदा होण्याऐवजी होईल नुकसान

Ajay Patil
Published:
fertilizer management

पिकांच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी पिकांना अनेक प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते व अशा पोषक घटकांची पूर्तता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांच्या माध्यमातून करतात. तसेच विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो.

कारण जमिनीचा सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्त्वाचा असतो व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब असणे खूप गरजेचे आहे. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खतांचा वापर करू लागले असून यामध्ये शेणखताचा वापर अगदी पूर्वीपासून शेतकरी करतात. परंतु शेतामध्ये शेणखताचा वापर करताना तो खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. नाहीतर फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते.

 शेणखत व्यवस्थित कुजलेले असेल तरच शेतात टाकावे

तुम्हाला जर शेणखत शेतामध्ये टाकायचे असेल तर ते व्यवस्थित कुजलेले असणे गरजेचे आहे. जर ते कुजलेले नसेल तर मात्र त्याची कुजण्याची प्रक्रिया ही शेतात शेणखताला पसरवल्यानंतर सुरू होते. परंतु या कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये शेणखताचे तापमानात वाढ होते  व जमिनीत मोठ्या प्रमाणावर उष्णता तयार होते.

या तयार झालेल्या उष्णतेचा शॉक पिकांच्या मुळाना बसतो व उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता वाढते. तसेच दुसरे नुकसान म्हणजे या अर्धवट कुजलेल्या खतामध्ये हुमणी, भुंगेरे वर्गीय किडींची अंडी तसेच अळ्या असतात. तसेच अशा कुजणाऱ्या शेणामध्ये मर रोग, मुळकुज, करपा इत्यादी रोगांसाठी कारणीभूत असलेल्या बुरशी देखील वाढण्याची शक्यता असते व त्यामुळे  शेतात शेणखत टाकण्याअगोदर ते पूर्णपणे कुजलेले असेल तरच टाकावे.

 शेणखत चांगले कुजण्यासाठी काय करावे?

शेणखत चांगले कुजण्याकरिता त्यावर कंपोस्ट कल्चरचा वापर करणे गरजेचे आहे. हे कंपोस्ट कल्चर शेणखतावर टाकून ते चांगले वर खाली करून मिक्स करून घ्यावे. साधारणपणे एक टन शेणखताकरिता एक किलो किंवा एक लिटर कंपोस्ट कल्चर वापरावे. तसेच शेण खताच्या माध्यमातून पसरू शकणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी,

सुडोमोनास फ्लूरोसोन्स या जैविक घटकांचा वापर शेण खड्ड्यामध्ये करणे गरजेचे आहे. हे घटक शेणखतावर टाकून ते चांगले खाली वर करून मिसळून घ्यावे. शेणखतामध्ये शेण किडे मोठ्या प्रमाणावर असतात. बुरशीच्या  नियंत्रणासाठी मेटारायझिम ऍनासोप्लि, बिव्हेरिया बॅसियाना सारख्या जैविक कीडनाशकांचा वापर करावा. त्यामध्ये ओलसरपणा राहील इतके पाणी शिंपडावे.

 चांगल्या परिणामाकरिता शेणखताचा  वापर कसा करावा?

तुम्हाला शेतामध्ये शेणखत वापरायचे असेल तर जमिनीची मशागत करताना शेवटच्या कुळवणी आधी एका हेक्टरमध्ये पाच ते दहा टन शेणखत मिसळून घ्यावे. भाजीपाला रोपवाटिकेमध्ये वापर करायचा असेल तर गादीवाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत ट्रायकोडर्माचा वापर करणे गरजेचे आहे. फळबागांकरिता वापर करायचा असेल तर उपलब्धतेनुसार एका एकर करिता दहा ते पंधरा टन शेणखताचा वापर करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe