Farmer Success Story:- बरेच शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करू लागल्यामुळे अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन मिळवणे शक्य झालेले आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर करून जितके उत्पादन पाच एकर किंवा दहा एकर क्षेत्रामध्ये येईल तितके उत्पादन शेतकरी दोन ते तीन एकर क्षेत्रामध्ये देखील आता काढू लागलेले आहेत.
हवामान बदलानुसार आता पीक पद्धतीत देखील बदल केले जात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून फायदा होताना दिसून येत आहे.तसेच आता अनेक तरुण शेतीमध्ये येऊ लागल्याने शेतीचा चेहरा मोहराच बदलून गेलेला आहे. याशिवाय असे अनेक व्यक्ती असतात की जे आयुष्यभर नोकरी करतात आणि नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर निवृत्ती नंतरच्या फावल्या वेळेमध्ये नेमके काय करावे
याचा विचार न करता घरची शेती असेल तर शेती करायला सुरुवात करतात व बरेच निवृत्त झालेले व्यक्ती शेतीमध्ये यशस्वी होतात. याच मुद्द्याला धरून जर आपण बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात असलेल्या तपोवन या गावचे सुभाष कराड यांचे उदाहरण घेतले तर महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली व मिरची पिकाच्या लागवडीतून अनन्यसाधारण यश मिळवले आहे.
मिरची पिकातून आहे अकरा लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, परळी तालुक्यातील तपोवन या गावचे रहिवासी असलेले सुभाष कराड हे महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर नोकरीला होते. परंतु या पदावरून निवृत्त झाल्यानंतर तपोवन या गावी त्यांनी वडिलोपार्जित शेती करण्याचे ठरवले.
त्यांची तपोवन या गावी दोन एकर जमीन असून यावर्षी त्यांनी या जमिनीवर मिरची लागवड करण्याचे ठरवले होते व मिरचीचे पिक त्यांनी घेतले. साधारणपणे डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी दोन एकर क्षेत्रात वीस हजार मिरचीच्या रोपांची मल्चिंग पेपरवर लागवड केली.
तसेच पाणी व्यवस्थापनासाठी ठिबकचा वापर केला. या दोन एकर मिरची पिकाचा त्यांचा एकूण खर्च पाहिला तर ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर तसेच लागणारी खते व पाणी, मिरची पिकासाठी आवश्यक कामांसाठी मजुरी व फवारणी याकरिता त्यांना एकूण दोन लाख रुपयांचा खर्च आला.
तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी मिरचीची मशागत तसेच खते, पाणी व किड नियंत्रण याबाबत व्यवस्थापन केले. सध्या त्यांच्या शेतामध्ये मिरचीची वाढ तीन फुटांपर्यंत झालेली असून मोठ्या प्रमाणावर मिरची लागलेली आहे. कमीत कमी एका झाडाला अडीचशे ग्रॅम मिरची निघेल असा अंदाज सुभाष कराड यांना आहे.
दोन एकर मिरचीतून 11 लाखांचे उत्पन्न अपेक्षित
मिरचीच्या उत्पादनाच्या बाबतीत ते म्हणतात की, प्रत्येक झाडाला अडीचशे ग्रॅम मिरची याप्रमाणे दोन एकरामध्ये पाच टन लाल मिरचीचे उत्पादन त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सध्याचे बाजार भाव पाहिले तर त्यानुसार या मिरची पिकातून 11 लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.
यावरून आपल्याला दिसून येते की वेळेचा सदुपयोग कसा करावा आणि वयाचे बंधन न येता जबर इच्छाशक्ती असेल तर व्यक्ती यशस्वी कसे होऊ शकतो? हे सुभाष कराड यांच्या उदाहरणावरून दिसून येते.