Cow Rearing:- आजकाल अनेक शेतकरी आणि तरुण मंडळी दूध व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून त्याकरिता म्हशींच्या तुलनेत गाईंचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. दूध धंद्यामध्ये वाढीव दूध उत्पादन मिळणे हे खूप महत्त्वाचे असते व याकरिता जातिवंत गाईंची निवड संगोपनासाठी करणे खूप गरजेचे असते.
आजकाल जर आपण गाईंच्या किमती पाहिल्या तर त्या लाख रुपयांच्या घरात आहेत. यामध्ये गाय पालनाला सुरुवात केली तर कालांतराने त्यापासून ज्या काही वासरांचा जन्म होतो त्या पुढील दूध उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण आज जी कालवड जन्माला येते ती उद्याची गाय असते.
म्हणून अशा कालवडींचे योग्य व्यवस्थापन ठेवले तर येणाऱ्या भविष्यकाळात त्या उच्च दूध उत्पादन देण्यास सक्षम होतात. कारण शेतकरी बंधू गाईपासून सुदृढ आणि अधिक उत्पादन देणारी कालवड जन्माला यावी याकरिता सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतात. परंतु जन्माला आल्यानंतर पुढील टप्प्यात कालवडीचे संगोपन कसे केले जाते याला देखील यामध्ये खूप महत्त्व असते.
तरच अशा कालवडी भविष्यकाळात अधिक दूध उत्पादन देण्यासाठी सक्षम ठरतात.याकरिता वासरू जन्माला आल्यापासून त्याचे विविध पद्धतीने संगोपन करणे खूप गरजेचे असते. यामध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात व त्याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.
वासरु जन्माला आल्यानंतर अशा पद्धतीने घ्यावी काळजी
1- बॉटल फीडिंग– तुम्हाला माहित आहे की जेव्हा वासरुचा जन्म होतो तेव्हा ते गायीच्या कासेला लावून त्याला दूध पाजले जाते. या पद्धतीने वासरांना दूध पाजताना ते किती दूध पिते? योग्य प्रमाणात दूध पीत आहे की नाही इत्यादी बाबत आपल्याला काहीच कळत नाही. बऱ्याचदा वासरे दूध पिताना गायीच्या कासेला इजा पोहोचवू शकतात.
या सगळ्या गोष्टी टाळण्याकरता जर अशा वासरांना जर बॉटलद्वारे दूध पाजले तर फायदा होतो. बॉटल फिडिंगच्या माध्यमातून आपण वासरांचे मोजमाप केलेल्या वजनानुसार त्याच्या शरीराला आवश्यक असलेले तेवढेच दूध पाजू शकतो.
2- काल्फ स्टार्टरचा वापर– काल्फ स्टार्टरमध्ये विविध प्रकारचे गुणधर्म असलेले खनिजांचे मिश्रण असते व यामुळे लहान वासरांची योग्य वाढ होण्याकरिता जे घटक आवश्यक असतात त्या संपूर्ण घटकांची पूर्तता या काल्फ स्टार्टरच्या माध्यमातून करता येते. त्यामुळे साहजिकच वासरांची वाढ झपाट्याने होते व मोठे झाल्यानंतर देखील त्यांची दूध उत्पादन क्षमता चांगली राहते.
3- जंत निर्मूलनाकडे लक्ष देणे– आपण पाहतो की लहान वासरांना बऱ्याचदा माती खाण्याची सवय असते व यामुळे शरीरामध्ये अनावश्यक व नुकसानकारक जंत तयार होत असतात. यांचे वेळीच निर्मूलन झाले नाही तर वासराची वाढ खुंटते तसेच त्यांचे पोट सुटते व आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो. त्यामुळे पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने वेळच्यावेळी जंत निर्मूलन करून घेणे गरजेचे असते.
4- आवश्यक लसीकरण करणे– कुठल्याही आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हा एक महत्त्वाचा उपाय आहे. लाळ्या खुरकूत, लंपी, आंत्रविषार इत्यादी विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी त्यांना या आजारांचे लसीकरण लहान व मोठ्या जनावरांना वेळच्यावेळी करून घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे भविष्यकाळात होणारे आजार व त्यापासून होणारे आर्थिक नुकसान आपल्याला टाळता येऊ शकते. एक वर्षाच्या आतील वासरे गोठ्यात असतील तर त्यांना ब्रुसोलिसिस ही लस देणे गरजेचे असते.
5- सकस आहाराकडे लक्ष देणे– सुका आणि हिरवा चारा योग्य प्रमाणामध्ये दररोज जनावरांना देणे खूप गरजेचे असते. कारण या माध्यमातूनच आवश्यक पोषक घटक जनावरांना मिळत असतात व अनेक आजारांपासून जनावरे दूर ठेवण्यास यामुळे मदत होते.
त्याकरिता योग्य चारा देणे खूप गरजेचे आहे आणि त्यासोबतच काळा किंवा बुरशी लागलेला चारा जनावरांना खायला देऊ नये. असा चारा खाल्ल्यामुळे जनावरे आजारी पडण्याची शक्यता वाढते.