Milk Production: पशुपालन व्यवसायामध्ये गाय व म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. गाय आणि म्हशीपासून मिळणारे दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढणे किंवा जास्तीत जास्त दूध मिळणे आर्थिक नफ्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते.
सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर फेब्रुवारी महिना जवळजवळ अर्धा संपत आलेला आहे व त्यानंतर मात्र आता तापमानामध्ये झपाट्याने वाढ होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे या वाढलेल्या उष्णतेचा प्रभाव हा गाई म्हशीवर देखील दिसून येतो
व त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा जनावरांच्या आरोग्यावर आणि दुधाचे उत्पादनावर देखील होतो. त्यामुळे वाढत्या उष्णतेच्या कालावधीमध्ये पशुपालकांना नुकसान सहन करावे लागू शकते.
त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि सरासरी दूध उत्पादन वाढवण्यासाठी घरगुती वस्तूंपासून औषधे बनवू शकतात व ते गाई आणि म्हशींना खाऊ घालून दुधाचे उत्पादन वाढवता येऊ शकते. याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेऊ.
हे सोपे मार्ग दूध उत्पादन वाढवण्यासाठी ठरतील फायद्याचे
1- घरगुती वस्तूंचा वापर- बदलत्या हवामानामुळे अनेकदा दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन कमी होते व त्यामुळे दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी पशुपालकांनी गव्हाची लापशी,
गुळसरबत, मेथी, कच्चे खोबरे, जिरे आणि भाजीपाला यांचे मिश्रण तयार करून दूध काढल्यानंतर सलग तीन दिवस दुभत्या जनावरांना पाजावे. घरगुती घटकांचे मिश्रण करून बनवलेले हे औषध सेवन केल्यावर तुमच्या जनावरांच्या आरोग्यासोबतच दूध उत्पादन क्षमता पूर्वीपेक्षा तुम्हाला वाढलेली दिसून येईल.
2- मोहरी आणि गव्हापासून बनवलेले घरगुती औषध- दुभत्या जनावरांचे दुग्धत्पादन पूर्वीपेक्षा अधिक वाढवण्यासाठी जनावरांना चारा व पाणी दिल्यानंतर 250 ग्रॅम गव्हाचे पीठ 200 ते 300 ग्रॅम मोहरीच्या तेलात मिसळून सात ते आठ दिवस संध्याकाळी खाऊ घालावे.
परंतु हे खाऊ घालताना लक्षात ठेवावे की हे खाल्ल्यानंतर जनावरांना पाणी देऊ नये. या प्रयोगामुळे काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या जनावरांच्या दुधाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येते.
3- चवळीचा चारा( वेल )- प्रथिन आणि फायबरने समृद्ध असलेल्या चळवळीच्या गवतामध्ये किंवा चवळीच्या वेलामध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे पशुवैद्यकीय तज्ञांच्या मते, दुभत्या जनावरांना चवळीच्या चारा खाऊ घातल्यास त्यांची दूध उत्पादन क्षमता वाढते.
कारण चवळीच्या गवतामध्ये म्हणजेच वेलीमध्ये असलेले प्रथिने आणि फायबर जनावरांमध्ये दूध निर्माण करण्यास मदत करतात. याशिवाय इतर गवतांच्या तुलनेत चवळीचा चारा किंवा चवळीचा वेल पचायला देखील हलका असतो व जनावरे ते आवडीने खातात.