कर्नाटकातील गाणगापूर येथे देवदर्शन करून अक्कलकोटच्या दिशेने परत येणाऱ्या भाविकांच्या मोटारीला अपघात होऊन त्यात चार महिलांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला,
तर अन्य तिघेजण जखमी झाले. सर्व मृत आणि जखमी अहमदनगर येथील राहणारे आहेत. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास अफझलपूर तालुक्यात बळुर्गीजवळ हा भीषण अपघात झाला.

बाबासाहेब सखाराम वीर (वय ५४), त्यांच्या पत्नी छाया वीर (वय ५०), त्यांच्या दोन्ही मुली कोमल बाबासाहेब वीर आणि राणी बाबासाहेब वीर तसेच हिरा बाडे अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत.
जखमींमध्ये चैताली (वय २४), सायली वीर (वय १३) आणि ममनी (वय ३) यांचा समावेश आहे. ममनी ही बालंबाल बचावली.
तिला साधे खरचटलेदेखील नाही. देव तारी त्या कोण मारी याचा प्रत्यय चिमुकल्या ममनी हिच्या बाबतील आल्याचे अफझलपूर पोलिसांनी सांगितले.
अहमदनगर येथील वीर कुटुंबीय अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन करून पुढे श्री दत्तात्रेयाचे स्थान असलेल्या गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते.
तेथील देवदर्शन आटोपून समाधानी चित्ताने हे भाविक अक्कलकोटच्या दिशेने परत निघाले होते.
तेव्हा वाटेत बळुर्गी गावाजवळ त्यांची डस्टर मोटारीचे (एमएच १६ बीएच ५३९२) टायर फुटले आणि चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली.
हा अपघात इतका भीषण होता की, त्यात मोटारीतील चार महिलांसह पाच व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.
जखमी झालेल्या तिघांना अफझलपूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अफझलपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.