अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठगाने घातला कोट्यवधीचा गंडा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- कोपरगाव येथे दहा वर्षांपासून वास्तव्यास असणार्‍या एका ठगाने अनेक शेतकरी, व्यावसायिक, बिल्डर्स यांचा विश्वास संपादन करत स्टील व सिमेंट कमी भावात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रूपयांना गंडा घातल्याची चर्चा कोपरगावात दबक्या आवाजात सुरू आहे.

या ठगाकडे अनेक लोकांचे पैसे अडकले असून त्यांच्यावर आता कपाळाला हात मारुन घेण्याची वेळ आली आहे. अनेकांनी या ठगाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला असल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे अनेकांच्या लक्षात आले.

त्यामुळे ज्यांची ज्यांची फसवणूक झाली आहे ते चांगलेच धास्तावले आहेत. एका धार्मिक स्थळाचा आश्रय घेत या ठगाने अनेकांचा विश्वास संपादन केला. त्याने तिथेच अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंधही प्रस्थापित केले. सुरुवातीला अनेकांकडून व्याजाने पैसे घेत त्यांची रक्कम वेळेत दिली. नंतर कोपरगाव, राहाता, शिर्डी, येवला, औरंगाबाद या पट्ट्यामध्ये बांधकाम व्यवसाय जोरात चालू असल्याने स्टील व सिमेंटच्या उद्योगात ठगगिरी करण्याची कल्पना त्याने सत्यात उतरवली.

सिमेंट व स्टील खरेदीवर त्याने तब्बल 40 ते 50 टक्के डिस्काउंट देत अनेकांकडून बुकिंगच्या नावाखाली पैसे घेतले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्याचा हा उद्योग सर्रास चालू होता. एक हजार गोणी सिमेंट किंवा दहा टन स्टिल बुकिंग केले तर त्याचे पैसे तो ऑनलाईन किंवा बँकेकडे वर्ग न करता रोख रक्कम घ्यायचा.

बुकिंग झालेल्या व्यवसायिक बिल्डर्स व शेतकर्‍यांना तो पाच सात महिन्यांच्या रोटेशनवर काही प्रमाणात सिमेंट व स्टील उपलब्ध करून द्यायचा. अगदी पन्नास टक्के किमतीवर हे उपलब्ध झाल्याने अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला. ही साखळी त्याने चार-पाच तालुक्यात तयार केली.

अनेक स्टील व सिमेंट व्यापार्‍यांनीही यामध्ये पैसे गुंतवले आहेत.आणि मग त्याने आपल्या डोक्यात असलेले टार्गेट पूर्ण केले. एकमेकांच्या विश्वासामुळे अनेक लोक या आमिषाला बळी पडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी पोलीस स्टेशनची संपर्क साधला मात्र या पठ्ठ्याने कोणताच पुरावा मागे न ठेवल्याने अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe