अहमदनगर ब्रेकिंग : तीन लाचखोर पोलीस कर्मचारी अखेर अटकेत !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- लाचखोरी प्रकरणातील फरार असलेले शेवगाव पोलीस ठाण्यातील तीन कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यात त्यांना जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर ते तिघे कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर झाले. तिघांना न्यायालयाने 24 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

एप्रिल महिन्यामध्ये वाळूची वाहतूक करणारे एक वाहन शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील वसंत कान्हु फुलमाळी, संदीप वसंत चव्हाण व कैलास नारायण पवार (रा. पाथर्डी) यांच्या पथकाने पकडले होते.

हे वाहन कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी या कर्मचार्‍यांनी वाळू व्यावसायिकाकडे 15 हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत त्या व्यावसायिकाने नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

लाच मागणीचा पुरावा एसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाला. त्यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. आरोपींचा अटकपूर्व जामीनासाठी दाखल अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

शेवटी हे पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर झाले. लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांना अटक केेली आहे. आता यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe