अहमदनगरकर काळजी घ्या शहरातील वाढली कोरोना रुग्णसंख्या बनली चिंताजनक !

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  शनिवारी २४ तासांत नगर शहरात नवे २८ रूग्ण आढळून आले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तिसरी लाट रोखण्याचे आव्हान प्रत्येकासमोरच आहे. नगर शहरातील कोरोना बाधितांचा आकडा पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत कमालीचा वाढला.

मार्च, एप्रिल मध्ये शहरातील झपाट्याने रूग्णवाढ सुरू होती. महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी त्यावेळी खमकी भुमिका घेत २ मे पासून कडक निर्बंध लागु केले होते. भाजीविक्रीसह, किराणा व खासगी आस्थापना बंद केल्या.

त्यानंतर पुन्हा निर्बंधांना मुदतवाढ दिली. त्यामुळे दुसऱ्या लाटेची तिव्रता कमी झाली. शहरात २८ जूनला एका दिवसांत अवघे ३ रूग्ण आढळले होते. तत्पूर्वी १५ मे रोजी एका दिवसांचा आकडा ३१६ होता. त्यामुळे दुसरी लाट नियंत्रणात आणता आली.

पुढे टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करून सायंकाळी चार पर्यंत आस्थापना खुल्या ठेवण्याची सुट दिली. सकाळपासून सायंकाळी चारपर्यंत पुन्हा एकदा रस्त्यांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. बहुतेकजण मास्क लावतात, अजूनही काहीजण मास्क वापरत नाहीत.

तसेच गर्दींचे नियोजन होत नसल्याने फैलाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने तिसऱ्या लाटेची तयारी केली, पण गर्दी नियंत्रणाचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.

त्यामुळे आता सतर्कता दाखवली नाही, तर उंबरठ्यावर पोहोचलेली तिसरी लाट पुन्हा शिरकाव करण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe