अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- महावितरण कंपनीने रोहीत्र बंद करून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, अशी मागणी अखिल भारतीय क्रांती सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल द्वारे केली आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्याना पाठविण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीने डी.पी. बंद करुन शेतीपंपाच्या विजबिल वसुलीसाठी पठाणी पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालू केला आहे.
अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसताना वीज बिल वसुलीसाठी मानसिक छळ चालू केला आहे. शेती पंपाचे वीजबिल भरा नाहीतर डी. पी. बंद, अशी सक्ती सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा कोणताही विचार न करता, त्यांची परिस्थिती न पहाता डी. पी. बंद करून वीजपुरवठा बंद केला जातोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आपले सरकार हिसकावून घेत आहे.
अशी शेतकऱ्यांमध्ये आपल्या सरकारविषयी भावना तयार झाली आहे. अशीच वसुली सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. डी.पी. नादुरूस्त होणे, तारा तुटल्यास सर्व खर्च शेतकऱ्यांना वर्गणी करुन करावा लागतो.
एवढे करुन शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने वीजपुरवठा मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. हि वीजबिल वसुली रोखावी तसेच शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे संपुर्ण वीज बिल माफ करुन शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याची मागणी क्रांतीसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved