‘त्या’ परिसराची महापौरांकडून पहाणी पाणी प्रश्‍न सोडवून, नागरी सुविधा पुरविण्याचे महापौरांचे आश्‍वासन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-शहरातील वारुळाचा मारुती परिसरातील नागरिकांना अनेक वर्षापासून नागरी सुविधा मिळत नसल्याने स्थानिक नागरिकांनी व पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

या इशार्‍याची दखल घेत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेतील अधिकार्‍यांसह या भागाची पहाणी केली. तर येथील नागरिकांच्या पाण्यासह, भूयारी गटार योजना व पथदिव्यांचे काम मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी मनपाचे शहर अभियंता सुरेश इथापे, अमृत योजना प्रमुख रोहिदास सातपुते, मेहेत्रे, लोखंडे, अ‍ॅड. कारभारी गवळी,

संगीता साळवे, एकनाथ उमाप, जनार्धन घाटविसावे, नितीन वांद्रे, रत्नाकर पवार, संतोष क्षीरसागर, विमल गायकवाड, आशिष सोनवणे, भीमराव कसबे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. शहरातील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढून महापालिकेने 2016 साली वारुळाचा मारुती येथे त्यांचे पुनर्वसन केले.

येथे 240 फ्लॅटमध्ये सुमारे दीड हजार नागरिक राहतात. तसेच या प्रकल्पा शेजारी असलेल्या 240 फ्लॅटमध्ये महापालिकेचे सफाई कर्मचारी राहतात. मात्र येथील नागरिकांचे पाणी, स्वच्छता व लाईटचे प्रश्‍न अद्यापि सोडविण्यात आलेले नाहीत. या प्रकल्पासाठी व येथील नागरिकांसाठी लाखो रुपये खर्च करुन 2015 साली पाण्याची टाकी बांधण्यात आली.

टाकी बांधून पडिक अवस्थेत असून, त्यामधून नागरिकांना पाणी वाटपासाठी नळ योजना कार्यान्वीत करण्यात आलेली नाही. पिण्यासाठी येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, टँकरद्वारे अनियमीतपणे पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

तसेच या भागात भूयारी गटार योजना नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. उघड्या गटारी व डासांचा उच्छादामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या भागात पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्री बाहेर पडता येत नाही. तर अंधारामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असल्याने

या मुलभूत नागरी सुविधा मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तर स्थानिक नागरिकांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेऊन सदर प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली होती.

महापौरांनी तातडीने दखल घेत या भागाची पहाणी करुन पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी टँकर वाढवून पाणी पुरविण्याचे आश्‍वासन दिले. तर तीन महिन्यात या भागातील पाण्याच्या टाकीत अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी सोडून नागरिकांना पाणी वाटप करण्याचे, भूयारी गटार योजना कार्यान्वीत करण्यासाठी व पथदिवे सुरु होण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना केल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe