अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- राज्यात आदर्शगाव हिवरेबाजार व त्या गावाचे नवनियुक्त उपसरपंच पोपटराव पवार यांची ख्याती दूरदूर पर्यंत पसरली आहे. नुकतेच त्यांनी आदर्शगाव गाव निर्मितीसाठी मौलिक सल्ला दिला आहे.
गावाचे नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना व योग्य दिशा मिळते. राजकारणात बदल घडत असतात. नव्याने नेतृत्व उदयास येऊन नवीन कार्यकर्ते घडत असतात. मात्र गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन प्रत्येकाने कार्य करण्याची गरज आहे.
सरपंचांनी आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्या असून, सर्व हेवेदावे सोडून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
नेप्ती (ता. नगर) येथे साई संजीवनी प्रतिष्ठान व नेप्ती ग्रामस्थांच्यावतीने पद्मश्री पोपट पवार व आमदार निलेश लंके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात पद्मश्री पवार बोलत होते. पद्मश्री पवार म्हणाले, नेप्ती व हिवरेबाजारचे सलोख्याचे संबंध असून, एक ऋणानुबंध निर्माण झाला आहे.
गावासाठी अनेक विकासात्मक योजना असून, या योजना कार्यान्वित करुन त्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. नुकतेच गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून चांगला अनुभव मिळाला.
एक रुपयाही खर्च न करता गावात 90 टक्के मतदान झाले. निवडणुकीत बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त झाल्या, तर आत्मविश्वास देखील वाढला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved