मुलगाच हवा म्हणून मारहाण; पत्नीचा झाला मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-  आठ वर्षीय मुलगा व चार वर्षीय मुलीनंतर कुुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली. मात्र, दोन वर्षांपूर्वी मुलाचा आजारपणाने मृत्यू झाला. त्यामुळे आता मूलबाळ होणार नसल्याने दुसरे लग्न करण्यासाठी पत्नीला हातपाय बांधून बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याचा प्रकार औरंगपूरमध्ये घडला.

श निवारी पहाटे याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात पतीविरोधात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. राधा महादेव रेड्डे (३१, रा. इरगाव, ता. गेवराई) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि महादेव रेड्डे हा पत्नीसह औरंगपूरमध्ये सालगडी म्हणून काम करत होता.

तो शेतातच वास्तव्यास होता. दोन वर्षांपूर्वी त्याच्या आठवर्षीय मुलाचा आजारपणाने मृत्यू झाला होता. ४ वर्षीय मुलगी व पत्नीसोबत तो राहत होता. दोन अपत्यांनंतर राधा यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली होती. मुलाच्या मृत्यूनंतर महादेव हा मुलगा हवा म्हणून आता दुसरे लग्न करतो म्हणत राधा यांना मारहाण करत असे. ४ फेब्रुवारी रोजी बीडमध्ये एका रुग्णालयात त्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पलटी करण्याबाबत दाखवले होते.

यासाठी ३५ हजारांचा खर्च अपेक्षित होता. दरम्यान, रुग्णालयातून सायंकाळी घरी आल्यानंतर महादेवने राधा यांना हातपाय बांधून रात्रभर लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या. ५ फेब्रुवारी रोजी एक शेजारीण घरी आल्यानंतर तिला बांधलेल्या अवस्थेतील राधा दिसली.

यानंतर हा प्रकार तिच्या सासरच्यांना कळवला गेला. सासू व शेतमालक औरंगपूरमध्ये येऊन रुग्णालयात घेऊन जात असताना राधाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.