अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-कोरोनाच्या संकट काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी झोकून देऊन आमदार निलेश लंके करीत असलेले काम राज्याला दिशादर्शक आहे.
त्यांच्या या कामामुळे रुग्णांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होत आहे. संकट काळात धावून जाण्याचे ‘भाळवणी मॉडेल’ महाराष्ट्रात आदर्श ठरेल असे मत राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
भाळवणी येथे उभारलेल्या अकराशे बेडच्या शरदचंद्र पवार कोव्हिड सेंटरला पद्मश्री पोपटराव पवार यांनी भेट देऊन येथील रुग्णांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले. आ. लंके यांचे त्यांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक केले.
यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितले होते, पुढारी जसे वागती गावोगावी तसेच लोक वागती घरोघरी म्हणून आहे पुढाऱ्यांवर जबाबदारी, अशीच संकट काळातील जबाबदारी आ.निलेश लंके यांनी घेतली आहे.
दिवसभर सेंटरमध्ये थांबून ते रुग्णांची सेवा करीत आहेत. यामुळे रुग्णांना आधार तर मिळतच आहे मात्र, त्यांच्यात विश्वासाची भावना निर्माण होत असल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले.
कोरोनाची महामारी हे जागतिक संकट असल्याचे सांगत या संकटाचा सामना करण्याची जबाबदारी खासदार, आमदारांप्रमाणेच प्रत्येक लोकनियुक्त प्रतिनिधींची असल्याचे सांगत या काळात पैसा ही समस्या नाही तर समाजासाठी झोकून देणे, कार्यकर्त्यांची टिम उभी करणे ही खरी गरज आहे.
यासाठी पक्ष, जातपात बाजूला ठेवून समाजासाठी आंतरिक भावना निर्माण करणे गरजेचे असून ती याठिकाणी पहायला मिळाली असेही पवार यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|