अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-जिल्ह्यातील राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोना रूग्ण वाढत आहेत. यात राहाता शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राहाता नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित निकत यांनी ३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना सात दिवस बंद राहणार असल्याचे पालिकेतर्फे ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
याबाबत निकत यांनी पत्रकारांना सांगितले, की वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायिकांनी आपले व्यवसाय सात दिवस पूर्णपणे बंद ठेवावे, असे आवाहन प्रशासनातर्फे व्यावसायिकांना करण्यात आले आहे.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आपले व इतरांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी मास्कचा नियमित व काटेकोरपणे वापर करावा. विनामास्क बाहेर फिरू नये, आपली, स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी.
आरोग्य व पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करून शहरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राहाता नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
वाढती रूग्णसंख्या विचारात घेता संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनबद्दल सूज्ञ नागरिक समाधान व्यक्त करत आहेत, तर लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करून प्रशासनाने या काळात नियम मोडणाऱ्या, बेफिकीरपणे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरीकांवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|