कोरोनाची भीती पसरली…रस्त्यावरची गर्दी ओसरली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीला जिल्ह्यासह संगमनेर शहरातही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनाची दहशत पाहता नागरिकांमध्येही ‘आठच्या आत घरात’ जाण्याची लगबग पहायला मिळत आहे. यामुळे शहरातील रस्ते ओस पडत आहेत. मागील दीड महिन्यांपासून राज्यातील काही जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातही कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे.

दररोज एकमेकांशी स्पर्धा करणार्‍या रुग्णसंख्येने मागील संपूर्ण वर्षातील सरासरीचे आकडे मोडीत काढण्यासोबतच कोविडच्या जिल्ह्यातील इतिहासात नवनवीन विक्रमही नोंदविले आहे.

दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने सक्रीय रुग्णांचा आकडाही आता 6 हजार 385 वर जावून पोहोचल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात 93 हजार 242 रुग्ण समोर आले असून त्यातील 85 हजार 652 रुग्णांनी यापूर्वीच उपचार घेवून घर गाठले आहे. तर दुर्दैवाने जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 205 जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी पाहता प्रशासनाने कडक नियमांची अमलबजावणी केली आहे. पोलीस, महसुल व पालिका प्रशासन संचारबंदी आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी रात्री आठनंतर रस्त्यावर उतरत आहेत.

मात्र आत्तापर्यंत यंत्रणेला बळाचा वापर करण्याचा प्रसंग आलेला नाही यावरुन कोविडच्या दुसर्‍या संक्रमणाने नागरिकही भयभीत झाल्याचे दिसू येत आहे.

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता गेल्या 28 मार्चपासून जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत सुरुवातीला जमावबंदी आणि त्यानंतर संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

निर्बंधांच्या कालावधीत केवळ औषधांची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी असून कामाशिवाय बाहेर आढळणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe