दंडकारण्य अभियानातून वनराईचा संगमनेर तालुका निर्माण – महसूल मंत्री नामदार थोरात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- संगमनेर व परिसर हा अवर्षण प्रवण क्षेत्र असून यामुळे येथे कायम कमी पाऊस पडतो. सततचा दुष्काळ व ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी १६ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या दंडकारण्य अभियानामुळे राज्यासह तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढली आहे.

आगामी काळात हीच परंपरा जोपासत संपूर्ण तालुका हा हिरव्या वनराईचा तालुका निर्माण करण्यासाठी प्रयत्न असून लाखो वृक्षांचे रोपण व संवर्धनासाठीची ही मोठी लोक चळवळ ठरली असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

अमृत उद्योग समूह व जय हिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव पान येथील पद्मावती डोंगरावर सोळाव्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे,ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर, माधवराव कानवडे,

रणजितसिंह देशमुख, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, मार्केट कमिटीचे सभापती शंकराव पा. खेमनर,सभापती सौ सुनंदाताई जोर्वेकर, सौ मीराताई शेटे, लक्ष्मणराव कुटे,संतोष हासे, रामहरी कातोरे,सौ.बेबीताई थोरात, प्रा. बाबा खरात समन्वयक बाळासाहेब उंबरकर,हौशीराम सोनवणे यांसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नामदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा कमी पावसाचा आहे. दुष्काळ व ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना स्वच्छ ऑक्सिजन मिळावा या करता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अत्यंत दूरदृष्टीतून सोळा वर्षांपूर्वी हे अभियान सुरु केले.

यामध्ये तालुक्यातील महिला, पुरुष,बालगोपाल या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही लोक चळवळ ठरली. संगमनेर मधून सुरू झालेली वृक्षसंवर्धन संस्कृती राज्याला दिशादर्शक ठरली आहे. कोरोना च्या संकटामध्ये सर्वांना प्राणवायू ऑक्सिजनचे महत्त्व कळाले.

यापुढील काळामध्ये वृक्षसंवर्धन व रोपन हे अत्यंत गरजेचे असून एका व्यक्तीने दरवर्षी किमान तीन झाडांची रोपं करून त्याचे संवर्धन केले पाहिजे. दंडकारण्य अभियान अंतर्गत दरवर्षी लाखो वृक्षांचे रोपण होत असल्याने १६ वर्षापूर्वीचा तालुका व आत्ताचा तालुका यामध्ये खूप फरक झाला आहे.

तालुक्यामध्ये वृक्ष संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. आगामी काळामध्ये संपूर्ण तालुका हा हिरव्या वनराईने नटलेला करण्यासाठी प्रयत्न असून त्यादृष्टीने सर्व सेवाभावी संस्था, सहकारी संस्था व तालुक्यातील नागरिक यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.

पर्यावरणाचे महत्व वाढीस लागले असून हिरवी वनराई ही प्रत्येकाला हवी आहे म्हणून प्रत्येकाने वृक्ष संवर्धन संस्कृती जोपासावी असे आवाहनही त्यांनी केले. तर आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील सोळा वर्षापासून दंडकारण्य अभियान राबविले जात आहे.

तालुक्यातील उघड्या, बोडक्या डोंगरांवर मोकळ्या जागेमध्ये अनेक ठिकाणी वृक्ष रोपण केले आहे. वृक्ष संवर्धन ही आता प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण कोरोना संकटात प्राणवायूचा मोठा तुटवडा निर्माण झाला यातून अनेकांना प्राण गमवावे लागले. ही परिस्थिती पुन्हा येऊ नये भविष्यातील पिढया सुरक्षित राहाव्यात यावर एक मात्र उपाय म्हणजे वृक्ष संवर्धन आहे.

यासाठी प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून यामध्ये सहभाग घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, वृक्षांना मुलांप्रमाणे प्रत्येकाने जपले पाहिजे. मुले जशी मोठी होऊन आई वडिलांना सुख समाधान देतात तशी वृक्षही प्रत्येक माणसाला अनेक सुविधा देतात. प्राणवायू देणारा वृक्षच आहे म्हणून त्याला आपण जपले पाहिजे.

यावर्षीच्या दंडकारण्य अभियानामध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पद्मावती परिसरातील डोंगरावर वृक्षारोपण करताना रिमझिम पावसामध्ये आनंद घेत अनेकांनी गाणी म्हणत वृक्षरोपण केले. सौ.दुर्गाताई तांबे,प्रा.बाबा खरात,शिवाजी कांबळे ,सत्यानंद कसाब यांच्या सुरेल गायन यासह विद्यार्थ्यांनी गायलेले विविध गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

यावेळी भाऊसाहेब कुटे,मधुकर गुंजाळ,सौ.अर्चनाताई बालोडे,सौ.निर्मलाताई गुंजाळ,अजय फटांगरे,पद्मा ताई थोरात, बाळासाहेब गायकवाड,प्रा.भाऊसाहेब शिंदे,सौ.सुनिता अभंग आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाळासाहेब उंबरकर यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe