अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-सध्या वैद्यकिय उपचारासाठी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यामुळे अनेकजण जिल्हा सामान्य रूग्णालय व इतर ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन स्टोअरेज / रिफिलर प्लांटच्या ठिकाणी गर्दी करत वाद घालीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे संबंधीत ठिकाणची कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी नगर भाग हद्दीतील पाच ऑक्सिजन स्टोअरेज/रिफिलर प्लांटच्या १०० मिटर परिसरात संचारबंदी जारी केली आहे.
प्राधिकृत व्यक्ती, कर्मचाऱ्यांखेरीज इतरांना या परिसरात सक्त मज्जाव करण्यात आला आहे. सध्या कोरोना संक्रमणाचे मोठे प्रमाण जिल्हयात वाढले आहे. बाधितांची संख्या मोठी असल्याने कोविड रुग्णालये व सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अनेक कोरोना संक्रमित रुग्णांवर ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत. उपचारासाठी ऑक्सिजनची दैनंदिन गरज भागविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशात पाठपुरावा सुरूच आहे.
या पाठपुराव्यामुळे दररोज टँकरद्वारे ऑक्सिजन उपलब्ध करण्यात काही प्रमाणात यश येत आहे.जिल्हयातील ऑक्सिजन स्टोअरेज/रिफिलर प्लांटमधून वैद्यकिय उपचारासाठी समन्वय राखीत रुग्णालयांना ऑक्सिजन देण्यात येतो आहे.
मात्र, अनेकदा प्लांटच्या ठिकाणी ऑक्सिजनच्या मागणीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यातून वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
त्यामुळे संबंधीत प्लांटच्या ठिकाणी कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उपाययोजना करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले होते.
त्यानुसार ऑक्सिजन प्लांटच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नगर उपविभाग हद्दीत असलेल्या ऑक्सिजन प्लांट परिसरात प्राधिकृत व्यक्ती, कर्मचाऱ्याखेरीज इतरांच्या संचारास प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सक्त मनाई केली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणे महाग पडणार आहे. त्यामुळे आता ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी १०० मिटर परिसरात येण्यास, उभे राहाण्यास, वाहन आणण्यास आता प्राधिकृत व्यक्तीखेरीज इतरांना बंदी राहाणार आहे.
तसेच खाजगी रुग्णालयांनी या कामी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर संबंधीत प्लांटचालक व पोलीसांना देणे या आदेशान्वये अनिवार्य करण्यात आले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|