अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- सोशल मीडियावर वैयक्तिक बदनामी करणाऱ्या आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याना धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्जत भाजपच्या वतीने करण्यात आली.
याबाबतचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे आणि पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आले. कुकडीच्या आवर्तनाला उशीर झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके, फळबागा जळाल्या.
आमदार रोहित पवार यांनी कुकडी सल्लागार समितीवर अशासकीय सदस्यपदी स्थानिक प्रतिनिधी नियुक्त करणे आवश्यक असताना त्याजागी श्रीगोंद्यातील ज्येष्ठ नेत्याची केलेली
निवड याबद्दल विरोधी पक्ष म्हणून भाजपच्या वतीने आवाज उठवला असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यानी सातत्याने सोशल मीडियावर भाजप नेत्यांच्या विरोधात एकेरी उल्लेख करून त्यांची वैयक्तिक बदनामी केली.
जे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्यांना दमबाजी करून त्यांची सोशल मीडियावर कौटुंबीक व वैयक्तिक बदनामी केली जात आहे. त्यांना धमकी दिली जाण्याचा प्रकार घडत आहे. आमदार पवार यांच्या विरोधात जो बोलेल, त्यास आम्ही सोडणार नाही,
असे बोलून लोकशाहीची गळचेपी केली जात आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरदेखील असभ्य भाषेत खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. गुंड प्रवृत्तीच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी,
अन्यथा कर्जत भाजप या गुंडगिरीच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा निवेदनाद्वारे तालुका प्रशासनास देण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी, शांतीलाल कोपनर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, किसान मोर्चाचे सुनील यादव, तात्यासाहेब माने, पप्पू धोदाड, राहुल निबोरे, सुनील काळे, सोयब काझी, एकनाथ धोंडे, धनंजय मोरे, नितीन लोंढे आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम